काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होता. पण माझ्या लोकांनाच मी नको. सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा इथे माझ्याशी चर्चा करायला हवी होती. एकाही आमदाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं म्हटलं तर आज संध्याकाळी मी वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवतो. उगाच का असं करताय? मी राजीनामा तयार करून ठेवला. या आणि राजभवनात पत्र घेऊन जा, सत्तेसाठी मी लाचार नाही असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह नंतर सुजात आंबेंडकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
“उद्धव ठाकरे साहेब आपण लाईव्ह येऊन ‘शिवसैनिकांना’ दिलासा दिलात उत्तमच..! आता एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत येऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेला दिलास द्या ना..?,” असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना आणि हिंदुत्व वेगळी नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कुणी काय केले हे सांगण्याची वेळ नाही. हिंदुत्वाबद्दल बोलणारा विधानसभेत बोलणारा मी मुख्यमंत्री आहे. काहीजण ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं भासवण्याचा प्रयत्न करतायेत. बाळासाहेब ठाकरेंचे विचारच आपण पुढे घेऊन चाललोय. विचार, मुद्दा तोच आहे. २०१४ मध्ये प्रतिकुल परिस्थिती शिवसेनेने ६३ आमदार निवडून आले. पहिल्या मंत्रिमंडळात आणि आत्ताच्या मंत्रिमंडळात तेच मंत्री होते. मधल्या काळात जे काही मिळाले शिवसेनेने मिळालं हे लक्षात ठेवा असं त्यांनी सांगितले.