अकोला : वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढल्यास लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ विरुद्ध भाजप, अशीच लढत रंगणार असल्याचा दावा करीत वास्तव लक्षात घेऊन महाविकास आघाडीने वाटपासंदर्भात आपसातील सेटलमेंट तातडीने करावी, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीत वंचित स्वबळावर लढल्यास किमान सहा जागांवर निवडून येईल, असा दावा ॲड. आंबेडकर यांनी केला.
‘वंचित’ काेणत्या जागांबाबत आग्रही आहे, यासंदर्भात मविआला माहिती दिली होती. काही सूचनाही मांडल्या होत्या. त्यामध्ये राज्यातील ४८ पैकी १५ ओबीसी उमेदवार असावे, किमान ३ उमेदवार अल्पसंख्याक समाजाचे असावे आणि घटक पक्षांनी आम्ही यापुढे भाजपसोबत युती करणार नाही, असे धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्वासित करावे, या सूचनांसंदर्भात मविआ काय निर्णय घेते ते पाहू, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काँग्रेस-शिवसेनेत १५; शिवसेना-राष्ट्रवादीत ९ जागांवर वाद! महाविकास आघाडीतील जागावाटपात काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात १५ जागांमध्ये वाद आहे. तर, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात ९ जागांवर वाद असल्याचे सांगत, घटक पक्षांनी जागा वाटपासंदर्भात समन्वय तातडीने साधावा, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
अद्याप घाेषणा नाही ‘मविआ’साेबत अद्याप युती झाली नसल्याने त्यांच्या काेणत्याही कार्यक्रमात ‘वचिंत’च्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. ‘वचिंत’कडून वर्ध्यात प्रा. राजेंद्र साळुंखे, सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याची माहिती चुकीची असल्याचे प्रवक्ते डाॅ़ धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले.
सहा, सात मार्चला मुंबईत बैठक जागा वाटपाचे सूत्र अंतिम टप्प्यात आले असून, सहा व सात मार्चला मुंबईत या संदर्भातील बैठक होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. मविआच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जागा वाटपाचे सूत्र ठरेल, असे त्यांनी सांगितले.
‘वंचित’ने २७ जागांची मागणी केल्याची बातमी अफवा असून त्यांनी सहा जागांची मागणी केली आहे. मी त्यांच्याशी आघाडी करण्यास आग्रही आहे. - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष
आमची चर्चा झाली आहे. दोन दिवसांत तीनही पक्ष ॲड. आंबेडकर यांच्यासोबत बोलतील. पाच किंवा सहा तारखेपर्यंत तिढा सुटलेला दिसेल.- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
ॲड. आंबेडकर यांची महाराष्ट्रात ताकद आहे. आंबेडकर नेहमीच आपल्या तत्वासाठी लढत असतात. त्यांनी कोणत्या आघाडीसोबत जावे हा त्यांचा निर्णय आहे.- दीपक केसरकर, प्रवक्ते, शिवसेना
‘जागा जवळपास निश्चित’ जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, या संदर्भात कोणतेही मतभेद नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी रविवारी अकोल्यात सांगितले.
आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचितचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.