मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांनी यापुढे फोन अथवा मोबाईलवर संभाषणाची सुरुवात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ने करावी, असा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी चांगलाच समाचार घेतला आहे.
आपण जयहिंद म्हणतो, जय महाराष्ट्र म्हणतो, जय हरी म्हणतो. पण यांनी मध्येच वंदे मातरम् काढले. वंदे मातरम् याला विरोध असण्याचे कारण नाही, पण तुम्ही महागाईबद्दल बोला, ती कमी करण्यासाठी काय करणार? जीएसटी कमी करण्यासाठी कौन्सिलमध्ये कोणती भूमिका मांडलेली आहे, असा सवाल करत महागाईवरून लक्ष हटवण्यासाठी हे सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले.
आमदारांच्या दादागिरीच्या भाषेवरही पवारांनी टीका केली आहे. शिवसैनिकांना ठोकून काढा, हात तोडा, हात तोडता आले नाहीत तर तंगडी तोडा, कोथळा काढा, अशी भाषा आमदार वापरतात. ही काय पद्धत आहे का? असा सवाल पवार यांनी केला.