ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव करत शिवसेनेने दिमाखदार विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंचा १९ हजार मतांनी पराभव करत मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा भगवा झेंडा रोवला आहे.
शिवसेना आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्याने वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाळा सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने थेट नारायण राणेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने निवडणुकीत रंग भरला. एमआयएमचे रेहबार सिराज खान हे निवडणूक लढवत असल्याने या तिरंगी निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
मातोश्रीच्या बालेकिल्ल्यात ही निवडणूक होत असल्याने शिवसेना व नारायण राणे या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. नारायण राणेंचा पराभव करण्यासाठी शिवसैनिक त्वेषाने प्रचारासाठी उतरले होते. तर नारायण राणेंनीही कुडाळमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी कंबर कसली होती. मात्र या लढतीमध्ये शिवसेना यशस्वी ठरली असून तृप्ती सावंत या भरघोस मतांनी विजय मिळवला आहे. तृप्ती सावंत यांना ५२, ७११ मतं मिळाली आहेत. तर नारायण राणेंना ३३,७०३ मतं मिळाली असून एमआयएमचे रेहबर सिराज खान यांना १५,०५० मतं मिळाली आहेत. रेहबर यांचे डिपोझीट जप्त होण्याची नामूष्की एमआयएमवर ओढावली आहे.