वाराणशी : वाराणशीतील ‘बिगफाईट’मधील प्रचारात विविध पक्षांचे बडे नेते गुंतले आहेत. परंतु शनिवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्यानंतर मतदारसंघाच्या बाहेरील नेत्यांना कुठल्याही परिस्थितीत थांबता येणार नसल्याचे आयोगाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांचे कुटुंबीय, भाजपाचे नेते अमित शहा आणि अरुण जेटली यांच्यासह अनेक नेत्यांना शनिवारी सायंकाळीच वाराणशी सोडावे लागणार आहे. आठव्या टप्प्यातील प्रचार थांबल्यानंतर अमेठीतील ‘आप’चे उमेदवार कुमार विश्वास यांच्या कुटुंबियांना मतदारसंघ सोडण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावरून आयोगाच्या अधिकार्यांवर पक्षपातीपणाचा आरोपदेखील झालेला. ७ मेची पुनरावृत्ती वाराणशीत होऊ नये यासाठी अतिरिक्त दंडाधिकारी एम.पी.सिंह यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. प्रचार थांबताच जिल्हा प्रशासनातर्फे प्रचारासाठी आलेले बाहेरचे नेते व कार्यकर्ते यांना शोधण्यासाठी मोहीम चालविण्यात येईल. जे वाराणशीतील मतदार नाहीत व प्रचाराच्या कामात गुंतले होते अशा व्यक्तींना लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर पाठविण्यात येईल. मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी नियम पाळावेच लागतील, असे सिंह यांनी सांगितले. भाजपाचे उमेदवार नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अजय राय आणि अरविंद केजरीवाल हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. राहुल गांधी शनिवारी येथे ‘रोड शो’ घेणार असून मोदी यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अमेठीमध्ये घेतलेल्या सभेला हे प्रत्युत्तर असेल, असे मानले जात आहे.
उपर्यांना सोडावी लागणार वाराणशी
By admin | Published: May 10, 2014 12:59 AM