ऑनालइन लोकमतसासवड, दि. 9 : सध्या पुरंदर तालुक्यात लग्नाचा हंगाम जोरात सुरु आहे. यानिमित्त सर्वत्र लग्न कार्यालयात पोहचण्यासाठी चारचाकीच्या युगात पारंपारीकतेला देखील महत्व आले आहे. वऱ्हाडी मंडळींना लग्न कार्यालयात पोहोचविण्यासाठी गाड्याच्या गाड्या डझनाने बुकिंग केल्या जात आहेत. अशी स्थिती असताना नारायणपूर येथील बोरकर कुंटुंबातील नवरदेव चक्क बैलगाडीतून लग्नाला आला. संपूर्ण बाजारपेठेतून मिरवणूक जात असताना नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी करून हा सोहळा पाहत होते.नारायणपूर येथील बाजीराव काळुराम बोरकर यांचे चिरंजीव नाथसाहेब बोरकर आणि शिवरी येथील पंढरीनाथ दत्तात्रय कदम यांची कन्या स्वाती कदम यांचा विवाह सोहळा सासवड जवळील एका कार्यालयात नुकताच मोठ्या थाटामाठात पार पडला. दोन्ही कुटुंबियांच्या वतीने हा सोहळा नयनरम्य होण्यासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. वधूकडच्या मंडळींनी वऱ्हाडी मंडळींसाठी चार चाकी गाड्या बुक केल्या होत्या. त्यामुळे ते सर्व वऱ्हाड मोटारींमधून आले. सध्या गावोगावी दुष्काळ पडला असून अनेक गावांमध्ये तर बैलगाड्या पाहायलाही मिळत नाही. मात्र नारायण पूरचे माजी सरपंच रामभाऊ बोरकर यांच्याकडून आधुनिक काळातही शेतीचे आणि बैलाचे नाते कायम राहावे, तसेच कोणतेही प्रदूषण न होता लग्नसोहळाही पर्यावरण पूरक व्हावा याची काळजी घेण्यात आली होती. यानिमित्त वर मंडळींनी आपले वऱ्हाड चार चाकी गाड्यांमधून न नेता बैलगाडी जुंपून नेण्याचे ठरविले. घरातील बैलगाडी होतीच, त्याबरोबरच गावातील आणि परिसरातील मित्रांना लग्नाला येताना चारचाकी गाडी न आणता बैलगाडी घेऊन येण्याचे विंनंतीपूर्वक निमंत्रण देण्यात आले.विशेष म्हणजे सर्वांनीच बैलगाडीचे निमंत्रण स्वीकारत सकाळीच दारात बैलगाड्या जुंपून हजर केल्या. तसेच बैलगाड्या नीटनेटक्या दिसाव्यात यासाठी बैलांना सजविण्यात आले.नवरदेवासाठीच्या गाडीची सजावट घरीच विकास कामठे यांनी केली. बैलांच्या अंगावर रंगबिरंगी झूल पांघरून गळ्यात घुंगऱ्याच्या माळा, पायात चाळ आणि गाडीच्या चाकालाही घुंगरे लावण्यात आली. नवरदेव, मित्रमंडळी व इतर वऱ्हाड गाडीमध्ये बसवून लग्न सोहळ्यासाठी प्रस्थान सुरु केले.गावचे माजी सरपंच रामभाऊ बोरकर, नाथशेठ बोरकर, बबन बोरकर, भारतनाना क्षीरसागर, चंद्रकांत बोरकर, अरूण बोरकर, भुजंग बोरकर, संजय न्हालवे, सदानंद बोरकर, नारायण गायकवाड , बाबुराव गायकवाड, मेघनाथ झेंडे, भगवान गोळे आदी ऊपस्थीत होते.
५१ बैलगाडीतून वऱ्हाड पोहचले लग्नाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2017 10:28 PM