- अक्षय चोरगे । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मान्सूनची वर्दी देणारे पक्षी मुंबईत दाखल झाले आहेत. या पक्ष्यांमध्ये चातक, मैना, ग्रे हेड स्टार्लिंग, हळद्या, कोकिळा, गंडेदार कोकीळ, इंडियन थीक नी, नवरंग, भिवर आणि ओरिएंटल डॉर्फ किंगफिशरचा समावेश आहे. पक्ष्यांच्या या भेटीमुळे मुंबईकर पक्षीमित्रांनाही पक्षीनिरीक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.मुंबईमध्ये आजवर ५७७ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. यात ऋतुबदलानुसार परदेशी पक्ष्यांचे आगमन होत असते. पावसाळ्यासह हिवाळा सुरू होण्यापूर्वी युरोप, रशिया आणि सैबिरिया येथून पक्ष्यांचे आगमन मुंबईत होत असते. विशेषत: पावसाळ्यापूर्वी मुंबईत दाखल होत असलेल्या परदेशी पक्ष्यांचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती पक्षीमित्रांनी दिली. दरम्यान, पावसाळ्यासह हिवाळ्यात मुंबईत दाखल झालेले परदेशी पक्षी उन्हाळ्यात स्वगृही परतात. परिणामी, या काळात मुंबईतील परदेशी पक्ष्यांचे प्रमाण कमी नोंदविण्यात येत असल्याचेही पक्षीमित्रांनी सांगितले.पक्षीनिरीक्षणासाठी ठिकाणेशिवडी खाडी, ठाणे खाडी, वसई खाडी, उरण खाडी, फणसाड पक्षी अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कोपर खाडी, कर्नाळा पक्षी अभयारण्य, मुरूड-जंजिरा, माथेरान, खोपोली, गोराई, आरे कॉलनी, पवई तलाव, वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आणि महालक्ष्मी रेसकोर्स परिसर.पावसाळ्यात सर्वात जास्त आकर्षण असलेला पक्षी म्हणजे चातक पक्षी. हा पक्षी पावसाळ्याच्या दोन आठवडे अगोदर मुंबईत आढळतो. मागील वर्षी १८ मे रोजी चातक पक्षी पहिल्यांदा मुंबईत दिसला होता. आतापर्यंत जरी हा पक्षी मुंबईत पक्षीप्रेमींना दिसला नसला, तरी तो मुंबईत दाखल झाला असावा.- विजय अवसरे, निसर्गमित्रनवरंग पक्षी हा पावसाळ्याच्या सुरुवातीला हिमालयाहून मुंबईत दाखल होतो. युरोपहून चातक पक्षी हजारो किमी अंतर पार करून मुंबईत येतो, असे विविध परदेशी पक्षी पाहण्याची संधी पावसाळ्यात पक्षीप्रेमींना मिळते.- नंदकिशोर दुधे, संशोधक सहायक, बीएनएचएस