ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 19 - कुख्यात गुंड बापू नायरची टोळी चालवत असल्याचा आरोप असलेल्या अॅड़ वर्षा फडके यांच्या पोलीस कोठडीत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. टी़. उत्पात यांनी २७ जानेवारीपर्यंत वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी दिला.
पुणे पोलिसांनी अॅड़ वर्षा फडके हिच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोका) नुसार कारवाई करुन अटक केली होती़ पुणे न्यायालयाने अॅड़ फडके यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती़ त्याविरोधात पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात अपील केले होते़ त्यावर न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती़ त्याची मुदत गुरुवारी संपत असल्याने अॅड़ फडके हिला न्यायालयात आणण्यात आले होते.
मुख्य सरकारी वकील उज्वला पवार यांनी न्यायालयात सांगितले की, वर्षा फडके हिच्याकडे ६ सीम कार्ड असल्याचे निष्पन्न झाले आहे़ हे सीम कार्ड वेगवेगळ्या लोकांच्या नावाने घेण्यात आले आहेत़. त्यावरुन ती टोळीतील लोकांशी संपर्क साधत असे़ तसेच लोकांकडे खंडणीची मागणी करीत असत़ तिने एकाला १ लाख ९५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे तपासात पुढे आले आहे. लष्कर न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्याचा तपास करायचा आहे़ या गुन्ह्यात अद्यापही ६ आरोपी फरार असून त्या या आरोपींच्या संपर्कात होत्या का याचा तपास करायचा आहे़ या गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीच्या पत्नीचा मोबाईल तिच्याकडे आहे. तो जप्त करायचा आहे़ पोलीस कोठडीच्या कालावधीत २ दिवस त्या ससून रुग्णालयात उपचार घेत असल्याने तपासाला पुरेसा वेळ मिळाला नाही़ त्यामुळे पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली़ सरकार पक्षाची मागणी ग्राह्य धरुन न्यायालयाने अॅड़ वर्षा फडके हिच्या पोलीस कोठडीत २७ जानेवारीपर्यंत वाढ केली़.