मुंबई, दि. 25 - मुंबईत आज सर्वत्र गणेशचतुर्थीचा उत्साह असताना सोबतीला पाऊसही होता. श्रीगणेशाच्या आगमनासह शुक्रवारी मुंबईत पावसाच्या जोरदार सरीही कोसळल्या. घरोघरी गणरायाची मुर्ती आणण्याची लगबग सुरु असताना पावसानेही त्याचवेळी जोर पकडला होता. त्यामुळे गणेशभक्तांना काही प्रमाणात त्रास झाला. पण उत्साह कुठेही कमी नव्हता.
गल्लीबोळातून गणपती बाप्पा मोरयाचा गजर ऐकू येत होता. मुंबई शहरात सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 60 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात 40 तर, पश्चिम उपनगरात 42 मिमी पाऊस झाला. सखल भागात पाणी साचू नये यासाठी पंपासह मनुष्यबळ सज्ज असल्याने मोठी समस्या उदभवली नाही.
फक्त हिंदमाता आणि सायन रोड नंबर 24 या सखल भागात पाणी साचल्याने काही काळासाठी बेस्टची वाहतूक अन्य पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली होती. पण तिथेही परिस्थिती लगेच नियंत्रणात आली.
ढोलताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले. आता पुढील 12 दिवस गणरायाचेच अधिराज्य दिसणार असून सर्वत्र भक्ती आणि उत्साहाचे वातावरण असेल. घरघरात, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये जल्लोषात बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, गुलाल, फुलांच्या उधळणीमध्ये बाप्पा घरोघरी आणले. मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणेश गल्लीचा राजा आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या सिद्धिविनायकची प्राणप्रतिष्ठा पहाटेच करण्यात आली. बाप्पांची पहिली आरतीही संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी गणपती बाप्पांचे आगमन झाले. नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या वर्षावर गणरायाच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण आहे.
सिद्धिविनायकाच्या आरतीला शिवमणी
गणेशचतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाची गणेशोत्सवातली पहिली आरतीदेखील झालेली आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी केली होती. विशेष म्हणजे सिद्धिविनायकाच्या आरतीला साथ लाभली ती वाद्यांचा बादशाह असलेल्या शिवमणी यांची. शिवमणी यांनी यावेळी वाद्य वाजवून सिद्धिविनायकाची आरती केली. सिद्धिविनायक मंदिरात आज गणेशचतुर्थीनिमित्त विशेष तयारी करण्यात आली आहे. मंदिराच्या कळसासह संपूर्ण मंदिराची सजावट करण्यात आली आहे. मंदिराचा गाभाराही फुलांनी सजवण्यात आला आहे.