मुंबई : श्रीगणेशाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या मुंबापुरीला गुरुवारच्या पावसाने झोडपून काढत गणपती बाप्पाला जोरदार सलामी दिली. सकाळपासून दुपारपर्यंत पडलेल्या पावसाने मुंबईकरांचा खोळंबाही केला नाही. उलटपक्षी उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका करीत सुखद गारवा दिला.गुरुवारी सकाळपासूनच शहरासह उपनगरात पावसाच्या रिमझिम सरी बरसू लागल्या. शहरात सकाळी पडलेल्या सरींनी दुपारी विश्रांती घेतली आणि सायंकाळी पुन्हा जोर पकडला; तर उपनगरात सकाळी रिमझिम बरसणाऱ्या सरींनी दुपारी चांगलाच जोर पकडला आणि वातावरण गार केले. दिवसभर पडणाऱ्या सरींच्या सान्निध्यात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे मंडपात आगमन होत होते. तर शुक्रवारची पूर्वतयारी म्हणून छोटछोट्या बँजो पार्ट्यांच्या सरावाला उधाण आले होते. पावसादरम्यान लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पश्चिम द्रुतमार्गावरील काहीशी वाहतूक कोंडी वगळता ऐन पावसातही मुंबई आपल्या वेगाने पुढे धावत असल्याचे चित्र होते.हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर आंध्र प्रदेश - दक्षिण ओरिसा किनारपट्टीलगत असलेल्या पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र स्थिर असून, त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र ते केरळच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा कायम असून, त्याची तीव्रता मात्र कमी झाली आहे. शिवाय नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण राज्यात सक्रिय असून, पुढील ४८ तासांत कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि मुंबई शहर आणि उपनगरातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
वरुणराजाची ‘श्रीं’ना सलामी!
By admin | Published: August 29, 2014 3:31 AM