मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अधिक गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार व्हावी तसेच शिक्षकांची शैक्षणिक उपयोगिता व परिणामकारकता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून १०० टक्के विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिक लाभ होईल या हेतूने ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शालेय शिक्षण विभाग आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३१ जानेवारीदरम्यान हे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानामधून ‘लोकजागृती’ कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या उपक्रमासाठी १ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. त्यानुसार बालेवाडी म्हाळुंगे, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले असून, २७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता उद्घाटन होणार आहे. काय असेल वारीतलोकसहभागातून शाळा सुधारणा कशी करावे याचे मार्गदर्शन तसेच भाषा, गणित, भूगोल यात प्रयोग करणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन यातून मिळणार आहे. लिंग समानता, मूल्यवर्धन विषयांचाही समावेश आहे. व्यवसाय शिक्षण, ई-लर्निंग, तंत्रस्नेही शिक्षण या विषयांच्या स्टॉल्सचाही समावेश असून, वारीत सहभागी होणाऱ्या शिक्षकांची आॅनलाइन पद्धतीने निवड केली आहे. (विशेष प्रतिनिधी)७ हजार शिक्षकांचा सहभाग : या वारीमध्ये निवडक ५० शिक्षणविषयक उपक्रम व शिक्षण पद्धतीचे सादरीकरण आणि प्रदर्शन होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यातील सर्व जिल्ह्यांतून दर दिवशी १८०० या सरासरीने सुमारे ७२०० शिक्षक २७ ते ३० जानेवारीदरम्यान भेट देणे अपेक्षित आहे. ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व जनतेस हे प्रदर्शन खुले राहणार आहे.वारीमागील संकल्पना : जिल्हा परिषद, नगरपालिका आदी भागातील शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता नवीन उपक्रम आणि प्रयोग करीत असतात. परंतु त्यांनी केलेले प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे या प्रयोगांची प्रेरणा अन्य शिक्षकांनीही घ्यावी आणि शैक्षणिक चळवळीचा प्रसार सकारात्मक दिशेने व्हावा ही यामागील प्रमुख संकल्पना आहे, असेही तावडे यांनी सांगितले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी वारी
By admin | Published: January 26, 2016 3:03 AM