आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क वसई:वसई विरार शहर महापालिका हद्दीतील गटारे व शौचालय सफाईचे काम करणाऱ्या सफाई कामगारांसाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध प्रकारच्या आरोग्य सुरक्षा म्हणून वसई विरार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीनची खरेदी केली असल्याची माहिती घनकचरा विभागाच्या वतीनं जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली असून यापुढे पालिकेतील सफाई कामगार हे या अत्याधुनिक मशीन द्वारेच शहरात साफसफाई करणार असे स्पष्ट केलं आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागा मार्फत शासनाचे गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे शहरातील सफाई कामगारांकरिता The Prohibition of Employment as Manual Scavengers and their Rehabilitation Act 2013 अन्वये सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज योजने अंतर्गत गटार सफाई व शौचालय सफाईचे काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या उदधाराकरिता विविध योजना राबविण्यात येत आहेत.
दरम्यान महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या सुरक्षिततेकरिता शहरातील सर्व प्रकारच्या गटारांची स्वच्छता करणे कामी महानगरपालिकेने 06 अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीन खरेदी केलेल्या आहेत. या मध्ये कोणत्याही सफाई कामगाराला आता प्रत्यक्ष गटारामध्ये न उतरता सक्शन कम जेटींग मशीनद्वारेच गटारा मधील गाळ सफाई करण्यात येणार आहे.
तसेच सार्वजनिक शौचालय, खाजगी घरे व इमारतीच्या शौचालयाच्या शौचटाक्या सफाई करिता 5 सक्शन मशीन (मैला टॅकर) प्रस्तावित असून महानगरपालिकेकडून त्या लवकरच खरेदी करण्यात येणार असल्याचे ही महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं सांगण्यात आले त्यामुळे आता सफाई कामगारांना या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक कामातून मुक्तता मिळाल्याने या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.