शशी करपे,
वसई- गेल्या आठवड्यात वसई रेल्वे स्टेशनमधील सरकत जिन्याचे उद्घाटन करण्यासाठी खासदारांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, काम अर्धवट असल्याचे कारण देऊन उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते. आज रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल, असे जाहिर करण्यात आले होते. मात्र, रेल्वेमत्र्यांऐवजी स्थानिक अधिकाऱ्यांनी उद्घाटन करून सरकता जीना सुरु केला. पण, काही वेळातच नादुरुस्त झाल्याने तो बंद पडला. त्यानंतर एका तासात जीना दुरुस्त करून पुन्हा सुरु करण्यात आला. वसई रोड आणि नालासोपारा रेल्वे स्टेशनवर सरकते जीने बसविण्यात आले आहेत. दोन्ही स्थानकावर चढत्या बाजूच्या जीन्याचे काम पूर्ण झाले असून उतरत्या बाजूच्या जीन्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. गेल्या आठवड्यात वसई रोड रेल्वे स्टेशनवरील सरकत्या जीन्याचे उद्घाटन करण्यासाठी खासदार चिंंतामण वनगा यांना बोलावण्यात आले होते. भाजपाने तसे बॅनरही लावले होते. पण, तांत्रिक अडचणी पुढे करीत रेल्वे प्रशासनाने उद्घाटन केलेच नाही. त्याऐवजी पादचारी पूलाचे उद्घाटन उरकण्यात आले. १३ आॅगस्टला खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते कार्यक्रम ठेवणारे रेल्वे प्रशासन सोमवारी मात्र खासदार वनगा यांना विसरल्याने भाजपाचे पदाधिकारी संतापले आहेत. खासदार वनगा यांच्या कार्यक्षेत्रात दोन्ही रेल्वे स्टेशन येतात. त्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटन करायला हवे होते, असे भाजपा नेते आणि रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शेखर धुरी यांनी सांगितले.सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मुंबईत विविध उद्घाटने करण्यासाठी आले होते. त्या कार्यक्रम पत्रिकेत नालासोपारा आणि वसई रोड रेल्वे स्टेशनवरील सरकत्या जीनंचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात प्रभू आले नाहीत. त्याऐवजी रेल्वे अधिकाऱ्यांनी उद्घाटन करून दोन्ही स्टेशनवरील चढत्या बाजूचे जीने सुुरु केले. मात्र, उतरत्या बाजूचे जीने सुरु होण्यास किमान दोन महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे सांगणत आले.दरम्यान, वसई रोड रेल्वे स्टेशनवरील सरकता जीना सकाळी साडेअकरा वाजता सुरु करण्यात आला. त्यानंतर अवघ्या तासाभरात नादुरुस्त होऊन बंद पडला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. दुरुस्तीसाठी मॅकेनिक बोलविण्यात आले. एक तासात जीना दुरुस्त करून प्रवाशांसाठी पुन्हा सुरु करण्यात आला.>१३ आॅगस्टला सरकत्या जीन्याचे उद्घाटन करण्यासाठी खासदार वनगा यांना बोलवण्यात आले होते. पण, काम पूर्ण झाले नसल्याचे कारण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगून उद्घाटन नंतर करू असे सांगितले होते. आजच्या उद्घाटनाची खासदार आणि मला कल्पना नाही. दादर येथील कार्यक्रमाचे निमंत्रण मला आज सकाळी १०.३० वाजता दिले. कार्यक्रम साडेअकरा वाजता होता. हा रेल्वेचा निष्काळजीपणा आहे.- शेखर धुरी, रेल्वे प्रवाशी सल्लागार समिती सदस्य