लोकमत न्यूज नेटवर्क वसई : मेरी टाईम बोर्डाने वसईच्या किनारपट्टीवरील धूप थांबवण्यासाठी दगडाचे बंधारे बांधले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम आणि देखभारअभावी कित्येक ठिकाणचे बंधारे उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टीची धूप पुन्हा सुुरु झाली आहे.वसईच्या किनारपट्टीवर आजही अनेक ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे नाहीत. धूप प्रतिबंधक बंधारे नसल्याने मोठे उधाण आणि पावसाळ््यात उसळणाऱ्या मोठ्या लाटांच्या तडाख्याने अनेक ठिकाणच्या किनारपट्टीची धूप सुरु आहे. त्यामुळे समुद्रानजिक असलेली घरे आणि शेती-बागायतींना फटका बसत आहे.मेरी टाईम बोर्डाने किनारपट्टीवर धूपप्रतिबंधक बंधारे बांधलेले आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण, निकृष्ट काम आणि देखभाल नसल्याने अनेक भागातील बंधारे वाहून जाण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राच्या लाटा आणि उधाणाच्या तडाख्याने बंधाऱ्याचे दगड वाहून जात असल्याने कामाच्या दर्जाबाबतच गावकरी शंका उपस्थित करू लागले आहेत. धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याच्या कामात मोठ्या गैरव्यवहार झाल्यानेच बंधारे वाहून जाऊन किनाऱ्याची धूप पुन्हा होऊ लागली आहे, असाही गावकऱ्यांचा आरोप आहे. अनेक ठिकाणच्या बंधाऱ्याचे दगडही वाहून गेल्याने समुद्रकिनारे उध्वस्त झाले आहेत. मात्र, याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने किनारपट्टी पुन्हा धोक्यात येण्याची भिती व्यक्त करण्यात येते.
वसईत बंधारे गेले वाहून, किनारपट्टीची धूप सुरू
By admin | Published: June 06, 2017 2:49 AM