वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात पुण्याचा फायरब्रँड कोणत्या पक्षात जाणार यावरून चर्चा सुरु झालेली आहे. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोरेंनी वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये, एवढीच इच्छा असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवरही उत्तर दिले.
वसंत मोरे लोकसभा लढवणार आहेत तर ते कुठून लढणार आहेत? रवींद्र धंगेकरांसारखे ते चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली म्हणजे काही वाईट केले नाही. पवार हे देशाचे नेते आहेत. त्यातून त्यांनी काहीतरी चांगले घ्यावे, असा सल्ला राऊत यांनी दिला.
राहुल गांधी यांची चांदवडला सभा आहे, त्यांच्या यात्रेचा फायदा महाविकास आघाडीला होईल. मी या सभेच्या तयारीसाठी आलो आहे, असे राऊत यांनी नाशिकमध्ये सांगितले. तसेच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केलल्या राऊत खोटे बोलतात या आरोपावर राऊत यांनी मी कधीच खोटे बोलत नाही असे स्पष्ट केले.
मी डॉ. आंबेडकर यांच्या विचारला मानणारा नेता आहे. ते सत्य मानणारे होते, मी सत्य सांगतो. हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीत यावे. आम्ही त्यांना 4 उत्तम जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी ज्या जागांची मागणी केली त्याच त्या जागा आहेत. आता प्रकाश आंबेडकर खोटे बोलत आहेत, असे मी म्हणणार नाही. माझ्या सोबत स्वतः प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत चर्चेला बसले होते आणि त्यांचे शिष्टमंडळ वर्षभरापासून माझ्यासोबत चर्चा करत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आम्ही बसलो होतो, असे राऊत म्हणाले. तसेच नवनीत राणा जेलमध्ये जातील या आंबेडकरांच्या वक्तव्यावर राऊतांनी आंबेडकर यांच्या तोंडात साखर पडो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मविआमध्ये जागावाटपाचा कोणताही तिढा नाही. जागा वाटप पूर्ण झाले आहे. वंचितला जो प्रस्ताव दिलाय त्यासाठी थांबलो आहोत. अशा चर्चा सोशल मीडियावर होत नाहीत. योग्य वेळी कोणत्या चार जागा दिल्या ते सांगू, जी बंद खोलीत चर्चा झाली ती उघड करण्यात मला रस नाही आणि प्रमुख लोकांनी बंद खोलीत केलेली चर्चा माध्यमांसमोर सांगणे राजकीय संकेतात बसत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.