मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले वसंत मोरे हे पुन्हा एकदा पक्षांतर करणार असल्याची चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनेतून वंचित बहुजन आघाडीत गेलेले वसंत मोरे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी वसंत मोरे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. त्यानंतर वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, वसंत मोरे यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.
संजय राऊत यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी वसंत मोरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल संजय राऊत म्हणाले की, "भेट घेऊ द्या, काय हरकत आहे. ते कार्यकर्ते आहेत एका पक्षाचे. त्यांनी पुण्यात लोकसभा लढवली आहे. त्यांचं सामाजिक राजकीय कार्य चांगलं आहे. आज दुपारी ते उद्धव ठाकरे साहेबांना भेटत आहेत, हे खरं आहे आणि लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील, हे देखील तितकच खरं आहे."
दरम्यान, वसंत मोरे हे मनसेत असल्यापासून कायम चर्चेत राहिले होते. अनेकदा पक्षात राहून वसंत मोरे यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलनाला वसंत मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची तातडीने पुणे मनसे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. वसंत मोरे यांना पदावरून हटवल्यापासून ते मनसेला रामराम करतील अशी चर्चा होती. त्यातच वसंत मोरे यांनी पुणे मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, मनसेची लोकसभेची भूमिका पाहता मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आशा वसंत मोरे यांना होती. मात्र मविआकडून काँग्रेसच्या वाट्याला ही जागा होती. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे इच्छुक होते. तरीही वसंत मोरे यांनी मविआच्या विविध नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीत वसंत मोरे यांनी ठाकरेंचे विश्वासू संजय राऊत यांचीही भेट घेतली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत मविआकडून वसंत मोरे यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर, वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. या निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली. आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.