ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 8 - महाराष्ट्राला बालसाहित्यिक म्हणून परिचित असलेले वसंत श्रीपाद निगवेकर (वय ९१, रा. विश्वतारा अपार्टमेंट, प्रतिभानगर, कोल्हापूर) यांचे शुक्रवारी (दि. ७) वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी विद्यापीठाच्या संगीतशास्त्र विभागातील प्रा. अंजली निगवेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सतत हसतमुख आणि मोठा मित्रपरिवार असलेला साहित्यिक हरपल्याची भावना व्यक्त झाली.
निगवेकर कुटुंबीय मूळचे करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावचे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर हे त्यांचे चुलतभाऊ. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे बराच काळ नागपुरात वास्तव्य राहिले. आरोग्य खात्यातील अधिकारी म्हणून ते तेथूनच निवृत्त झाले. त्यामुळे नागपुरातही त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. निवृत्तीनंतर ते कोल्हापुरात स्थायिक झाले. त्यांनी चौफेर लेखन केले; परंतु तरीही त्यांची ‘बालसाहित्यिक’ म्हणूनच जास्त ओळख आहे. लहान मुलांसाठी त्यांनी कथा, ललित चरित्र आणि नाटिकालेखन केले आहे. त्यांची सुमारे तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी मुलीच्या नावाने लिहिलेले ‘अंजूच्या गोष्टी’ हे दोन भागांतील पुस्तकही खूपच लोकप्रिय झाले होते. नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि सांगली आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. कोल्हापुरातील कोणत्याही साहित्यिक कार्यक्रमास त्यांची आवर्जून उपस्थिती असे. नेहमी हसतमुख व मृदू स्वभाव असलेले निगवेकर ज्येष्ठ नागरिक संघ, मराठी बालकुमार साहित्य सभा या संस्थांशीही एकरूप झाले होते. त्यांचा मुलगा बालरोग तज्ञ असून ते सध्या प्रवरानगर येथे असतात.
वसंत निगवेकर यांचे बालसाहित्यातील योगदान फार मोठे आहे. ते जेवढे साहित्यिक म्हणून थोर होते, तेवढेच ते माणूस म्हणूनही मोठे होते. मराठी बालकुमार सभा व बालरंजन संस्थेतर्फे त्यांना श्रद्धांजली.
- रजनी हिरळीकर, मराठी बालकुमार साहित्य सभा