केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे (Vasantdada Nagari Sahakari Bank Ltd.) लायसन रद्द केल्याने खळबळ उडाली आहे. आरबीआयने सोमवारी याची माहिती दिली. बँक सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे खातेदारांचे, ठेवीदारांचे सर्व पैसे परत करू शकणार नाही. या बँकेचे लायसन सोमवारी व्यवहार संपल्यानंतर रद्द होणार आहे. यानंतर ही बँक कोणतेही व्यवहार करू शकणार नाही, असे आरबीआयने सांगितले.
बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देताना आरबीआयने म्हटले की, वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द करणे आणि दिवाळखोरीत गेल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यानंतरच ठेवीदारांना विमा आणि कर्ज गॅरंटी मंडळाकडून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. याप्रकारे सहकारी बँकेचे जवळपास 99 टक्के खातेदार त्यांची जमा रक्कम काढू शकणार आहेत.
दुसरीकडे आरबीआयने चिंता व्यक्त करताना म्हटले की, कोरोन संकटामुळे बँकांची स्थिती ढासळण्याची शक्यता आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे बँकांच्या संपत्तीवर संक्रांत येऊ शकते. तसेच बँकांकडील निधीतही कमी येऊ शकते. याचसोबत सरकारकडेही महसूल कमी झाला आहे.
आरबीआयने या आधी म्हापसा बँक, सीकेपी को ऑपरेटीव्ह बँक, कराड जनता सहकारी बँकेचे लायसन गेल्या वर्षी रद्द केले होते. याचबरोबर आरबीआयने १०० हून अधिक सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.