लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालय व कम्युनिटी सेंटरच्या इमारतींचे बांधकाम रखडले आहे. काम पूर्ण करण्याची मुदत आॅक्टोबर २०१५ मध्येच संपली आहे. महत्त्वाचे दोन्हीही प्रकल्प रखडविणाऱ्या ठेकेदारांवर अद्याप काहीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. रखडलेल्या कामांमुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्याने ती पाडून तेथे नवीन बहुउद्देशीय इमारत बांधण्याचे काम डिसेंबर २०१३ मध्ये सुरू करण्यात आले. इमारतीचे बांधकाम आॅक्टोबर २०१५ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु ठेकेदाराने अपेक्षित गतीने काम केले नाही. अनेक महिन्यांपासून बांधकाम जवळपास ठप्प झाले आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपून २० महिन्यांचा कालावधी संपला असून अजून जवळपास ५० टक्के काम शिल्लक आहे. यामुळे विभाग कार्यालय मासळी मार्केटमध्ये हलविण्यात आले आहे. चार वर्षे मार्केटमध्ये विभाग कार्यालय सुरू करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. वाशी सेक्टर १४ मध्येच महापालिकने कम्युनिटी सेंटरच्या इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. ते बांधकामही रखडले असून अनेक महिन्यांपासून ठेकेदाराने काम थांबविले आहे. महापालिकेचे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प अर्धवट अवस्थेमध्येच आहेत. दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रभाग ५८ चे नगरसेवक प्रकाश मोरे यांनी वारंवार महापौर सुधाकर सोनावणे, आयुक्त व शहर अभियंत्यांकडे पाठपुरावा केला आहे. महापौरांना व अधिकाऱ्यांना सोबत घेवून इमारतींचा पाहणी दौरा केला आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्येही पाहणी दौरा करण्यात आला आहे. परंतु यानंतरही प्रशासन ठेकेदाराकडून काम करून घेण्यात अपयशी ठरले आहे. याविषयी मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदार काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.>वाशी विभाग कार्यालय व सेक्टर १४ मधील कम्युनिटी सेंटरचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन ठेकेदाराकडून काम करून घेत नाही. दोन्ही प्रकल्पांचे काम लवकर करावे व ठेकेदार कामे करत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. - प्रकाश मोरे,नगरसेवक, प्रभाग ५८.
वाशी विभाग कार्यालयासह कम्युनिटी सेंटरचे बांधकाम रखडले
By admin | Published: June 09, 2017 2:44 AM