वसई : वसई विरार पालिकेने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वसईकर रविवारी सकाळी झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वसईचे रस्ते आणि गल्लीबोळात उत्साहाने स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.पालिकेने १५ आॅक्टोबरपर्यंत शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. शहरातील रस्ते, गल्ल्या, इमारतींचे आवार स्वच्छ करण्यासाठी शेकडो नागरीक झाडू घेऊन उतरले होते. नगरसेवक, अधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीत रविवारी सकाळपासून दुपारपर्यंत स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. १०६ ठिकाणी प्रत्येक वॉर्डात शंभरहून अधिक नागरीकांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान केले. महापौर प्रविणा ठाकूर, आयुक्त सतीश लोखंडे, माजी महापौर नारायण मानकर यांनी नवघर-माणिकपूर स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता. वसई विरार परिसरात काही ठिकाणी स्वच्छता मोहिमेची जनजागृती करण्यासाठी दिंंडीही काढण्यात आली. यावेळी पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. १५ आॅक्टोबरपर्यंत चालणारी ही स्वच्छता मोहिमेत तलाव, उद्यान, समुद्रकिनारे, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल परिसरासह सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये राबवण्यात येणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंबंधी असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वसई विरार पालिकेने स्वच्छता अॅप सुरु केले आहे. (प्रतिनिधी)
स्वच्छतेसाठी वसईकर रस्त्यावर
By admin | Published: October 03, 2016 3:26 AM