अकोला: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. अशातच, राजकीय रणनीतीकार आणि स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव यांना त्यांच्या सभेत जोरदार धक्काबुक्की केली. ही घटना फक्त धक्काबुक्कीपुरती मर्यादित राहिली नाही, तर कार्यकर्त्यांनी सभेत जोरदार घोषणाबाजी करत खुर्च्या तोडल्या.
स्वराज पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी सोमवारी अकोल्यात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र कार्यक्रमादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत योगेंद्र यादव यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या पक्षाच्या मताशी असहमत असल्याचे म्हटले. यावेळी पोलीस आणि योगेंद्र यादव यांच्या साथीदारांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांनी योगेंद्र यादव यांना जीपमध्ये बसवून थेट पोलीस स्टेशन गाठले.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यात 'संविधान सुरक्षा आणि आपलं मत' या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावला. ही घटना अकोला जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनात घडली. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मंचावर गोंधळ घातला. सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी खुर्च्या फोडल्या आणि मंचावरून माईक आणि इतर वस्तू फेकून दिल्या.
या घटनेनंतर योगेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. ते म्हणाले, आम्ही 'संविधान सुरक्षा आणि आपलं मत' या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता. पण, 40-50 लोकांच्या जमावाने कार्यक्रमात खुप गोंधळ घातला. पोलिसांसोर गुंडांकडून हल्ले आणि तोडफोड सुरू होती. गेल्या 25 वर्षात मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत, पण यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. हे केवळ महाराष्ट्रासाठीच नाही, तर संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीही खेदजनक आहे.