मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातून जोरदार पक्षांतर सुरू आहे. तर सत्ताधारी भाजपमध्ये जाण्यासाठी नेत्यांमध्ये जणूकाही स्पर्धा सुरू झाली आहे. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीतून आतापर्यंत ३० हून अधिक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेत दाखल झाले आहे. राष्ट्रवादीला दररोज एकापोठापाठ धक्के बसत आहेत. त्यात आता राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीला लागलेली गळती पाहता, काँग्रेसने सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी निश्चित मानली जात असली त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही. त्यातच नव्याने उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीची झोप उडविली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून वंचितला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावर वंचितने काँग्रेसला अर्ध्या जागांची ऑफर देत राष्ट्रवादीला दूर ठेवण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे या आघाडीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यात भाजप आणि शिवसेनेची मजबूत स्थिती पाहता, राष्ट्रवादीसोबत युती करण्यापेक्षा वंचितला सोबत घेतल्यास पक्षाला फायदा होईल, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये तयार होत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकाच जागी विजय मिळाला. तर राष्ट्रवादीने चार ठिकाणी विजय मिळवला. आकडेवारीवरून आघाडीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीलाच झाला. तर अनेक मतदार संघात राष्ट्रवादीकडून हवी तशी मदत मिळाली नाही. त्यातच राष्ट्रवादीकडे ग्राउंड लेव्हलवर कार्यकर्त्यांची असलेली कमतरता समोर आली आहे. अशा स्थितीत वंचितसोबत गेल्यास भाजपला टक्कर देणे शक्य होईल, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.
लोकसभेला अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडली नसल्याने राष्ट्रवादीचेच नव्हे तर काँग्रेसचेही मोठे नुकसान झाले. शिवाय जागाही भाजपने जिंकली. राष्ट्रवादीच्या हटखोर भूमिकेमुळे काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुलासह भाजपमध्ये दाखल झाले. तर नगरमध्ये राष्ट्रवादीकडे नेतेच उरले नाहीत. लोकसभेला सामोपचाराने घेतले असते तर, कदाचित चित्र काहीसं वेगळ राहिलं असतं, असंही अनेकांना वाटतं. तर राष्ट्रवादीची विश्वासहार्ता देखील काँग्रेसमध्ये चिंतेचा मुद्दा आहे. २०१४ मध्ये विधानसभा निकालानंतर लगेचच राष्ट्रवादीने भाजपला न मागता पाठिंबा दिला होता. यापुढेही राष्ट्रवादीकडून तसं काही केलं जावू शकतं असा अंदाज बांधला जात आहे.
पडझडीमुळे राष्ट्रवादी हैराणदिग्गजनेते सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मी राष्ट्रवादीसोबतच असल्याचं सांगणारे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेताना दिसतात. त्यानंतर लगेचच पक्षांतराचा मुहूर्त ठरतो. शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. आता राष्ट्रवादीमध्ये मोजकेच अनुभवी नेते उरले आहेत. त्यातून भाजपच्या गळाला कोणी लागणार याची शाश्वती पक्षाध्यक्षांना देखील नाही. एकूणच मोठ्या पडझडीमुळे राष्ट्रवादी पक्ष हैराण झाला आहे.