राजू शेट्टींना आघाडीपेक्षा 'वंचित'चा पर्याय जवळचा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 01:07 PM2019-08-13T13:07:57+5:302019-08-13T13:08:42+5:30
राजू शेट्टी यांनी आघाडीकडे ३५ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. विधानसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी आधीच स्पष्ट केले असून विधानसभा निवडणुकीत संघटनेतील अधिकाधीक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा शेट्टी यांचा प्रयत्न आहे.
मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघाटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना पराभव सहन करावा लागला. शेट्टी यांचा लोकसभेतील पराभव संघटनेतील कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक आहे. परंतु, हा पराभव बाजुला सारून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी चर्चा देखील सुरू आहे. मात्र राजू शेट्टींसाठीवंचित बहुजन आघाडीच जवळचा पर्याय असल्याचे चित्र राज्याच्या राजकारणात दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या मत विभाजनामुळे राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेला वंचितने घेतलेली मते आघाडीची चिंता वाढविणारेच आहेत. त्यामुळे वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न आघाडीकडून करण्यात आले. परंतु, त्याला अद्याप यश आले नाही. लोकसभेला राजू शेट्टी आघाडीसोबत होते. आता विधानसभेला देखील शेट्टी यांनी आघाडीसोबत जाण्याची तयारी सुरू केली असली तरी प्रकाश आंबेडकर आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीमुळे शेट्टी यांची धाव नेमकी कुणीकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच शेट्टी यांनी वंचितला सोबत घेतले तर आघाडीत येईल असा इशाराही दिला होता.
राजू शेट्टी यांनी आघाडीकडे ३५ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. विधानसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी आधीच स्पष्ट केले असून विधानसभा निवडणुकीत संघटनेतील अधिकाधीक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा शेट्टी यांचा प्रयत्न आहे. यामुळे स्वाभिमानीचे पक्ष संघटन तळागाळापर्यंत मजबूत करण्यास फायदाच होईल. मात्र आघाडीतून त्यांना ३५ जागा मिळतील यावर शंका आहे. परंतु राजू शेट्टी वंचितसमोबत गेल्यास त्यांचा ३५ जागाचा लढविण्याचा इरादा पूर्ण होऊ शकतो. याचा फायदा पक्षसंघटन वाढविण्यासाठी होणार आहे. त्यामुळे शेट्टी यांच्यासाठी तरी आघाडीपेक्षा वंचितचा पर्यायच जवळचा आहे.
आघाडीचा फॉर्म्युला ठरेना
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांनी विविध यात्रा काढल्या. तर वंचित बहुजन आघाडीने अनेक मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती उरकल्या आहेत. परंतु, आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला नाही. त्यामुळे घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानीने अद्याप काहीही भूमिका स्पष्ट केली नाही.