VBA Prakash Ambedkar News: महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. यानंतर या योजनेत कोट्यवधी महिलांनी नोंदणी केली. या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसेही लाखो महिलांच्या खात्यात जमा झाले. या योजनेसाठी महायुती सरकार राज्यभरातील विविध ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत. परंतु, या योजनेवरून महाविकास आघाडीचे नेते सरकारवर टीका करत आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
पेसा भरती व्हावी, या मागणीसाठी माजी आमदार जे. पी. गावित गेल्या चार दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालय बाहेर उपोषणाला बसले आहेत. आदिवासी १७ संवर्गमधील पैसा कायद्यांतर्गत पदभरती करण्यात यावी ही प्रमुख मागणी त्यांची आहे. या आंदोलकांच्या भेटीला प्रकाश आंबेडकर गेले होते. यानंतर मीडियाशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
लाडकी बहीण योजनेला कुठून पैसे आला?
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दुर्दैवाने सरकारला अदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणीव नाही. आपले कंत्राटदार चालले पाहिजे यासाठी डीबीटी बंद केली. बोगस आदिवासी भरती आहेत असे विधानसभेत सांगितले. जे बोगस होते त्यांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले. पण आदिवासी पेसा अंतर्गत भरती केली नाही. लाडकी बहीण योजनेला कुठून पैसे आला? आदिवासीच्या बजेटचे ७ हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले का? जर असे नाही तर सरकारने आदिवासीच्या बजेटच्या विवरण द्यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
दरम्यान, आमचे उपोषण २८ तारखेपर्यंत सुरूच राहणार आहे. येत्या २८ तारखेला राज्यातील सर्व आदिवासी पात्र उमेदवार नाशिक मध्ये येणार आहेत. २८ तारखेला मोठे आंदोलन करण्याची आम्ही भूमिका घेणार आहोत. तोपर्यंत पेसा अंतर्गत भरतीबाबत निर्णय नाही झाला तर मुख्यमंत्र्यांच्या दारातच जाऊनच बसणार आहोत. प्रकाश आंबेडकर यांच्या ऑफरबाबत माकपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार करू. बाबासाहेबांनी सुद्धा सांगितले की, लढायचे असेल तर पोटात अन्न पाहिजे. महाविकास आघाडीचे काही लोक इथे येऊन पाठिंबा देऊन गेले, अशी प्रतिक्रिया माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिली.