Lok Sabha Election 2024 : सोलापूर : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने माढा या लोकसभा मतदारसंघासाठी रमेश बारसकर (Ramesh Baraskaar) यांना तिकीट दिले आहे. रमेश बारसकर हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर बारसकर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. रमेश बारसकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी कार्यरत होते. मात्र वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिल्यानंतर आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वंचितचा किंवा वंचितच्या अन्य कोणत्याही नेत्याचा उल्लेख केलेला नाही.
अलिकडच्या काळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी रमेश बारसकर यांचा संपर्क वाढल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. ही बाब लक्षात घेता, त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश चिटणीसपदी रमेश बारसकर कार्यरत होते.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यानंतर वंचितच्या उमेदवारांची संख्या १९ वर पोहोचली आहे.
दुसऱ्या यादीतील उमेदवार : हिंगोली : बी. बी. चव्हाण, लातूर : नरसिंहराव उदगीरकर, सोलापूर : राहुल गायकवाड, माढा : रमेश नागनाथ बारसकर, सातारा : मारूती जानकर, धुळे : अब्दुल रहेमान, हातकणंगले : दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटील, रावेर : संजय पंडित ब्राम्हणे, जालना : प्रभाकर देवमन बकले, मुंबई उत्तर-मध्य : अबुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग : काका जोशी.