Prakash Ambedkar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या तयारीला, बैठकांना, चर्चांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आता तिसऱ्या आघाडीचा पर्याय राज्यातील जनतेसमोर येणार आहे. संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी एकत्रित येत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या तिसऱ्या आघाडीत सामील होऊ शकतात, अशा चर्चा आहेत. यातच ठाकरे गटाला महाविकास आघाडीत ४४ जागा मिळतील, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत दावा केला. विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी काँग्रेस असे ठरवत आहे की, १५० जागांच्या खाली यायचे नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी असे ठरवले आहे की, ८८ जागांच्या खाली यायचे नाही. त्यामुळे आपण जर या दोन्ही पक्षाच्या जागांच्या मागणीचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील. एवढ्या जागा ठाकरे गटाला सोडायला ते तयार असल्याची परिस्थिती आहे. आता हा फॉर्म्युला समोर येत असल्यामुळे यावरून आणखी राजकारण होईल. काही ओबीसींच्या नेत्यांनी सांगितले की, सर्वांत मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर असणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीशिवसेना ठाकरे गटाबरोबर जाणार का?
आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी शिवसेना ठाकरे गटाबरोबर जाणार का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना करण्यात आला. आम्ही कोणाबरोबर जाणार आहोत, हे आम्ही सांगितले आहे. आदिवासींचे संघटन होत आहे, त्यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी जात आहे. विविध जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या काही संघटना आहेत. त्यांना बरोबर घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या आघाडीमध्ये ज्याला कोणाला यायचे असेल त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. मात्र, ही आघाडी कोणाकडे जाणार नाही. आमचे दरवाजे भारतीय जनता पक्ष सोडून बाकी कोणासाठीही खुले आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार नसतील, तर ते शरद पवार यांच्या इशाऱ्यावर आंदोलन चालवत होते, हे व्हेरी क्लियर्ड झाले. मराठा नेते म्हणजे शरद पवार, अशी चर्चा ओबीसींमध्ये सुरू आहे. मनोज जरांगे यांनी भूमिका लवचिक नाही. त्यामुळे मराठा समाजाचे नुकसान होत आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळेल, असे आम्हाला वाटत नाही. कारण परिस्थितीच तशी आहे. म्हणूनच ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणाची भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. गरीब मराठा, रयतेतील मराठा यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नाही. दोनवेळेस न्यायालयाने फेटाळले आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी संविधानिक नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.