Shiv Sena Shinde Group News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी आणि जागावाटप यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. जागावाटपावरून विरोधकांच्या इंडिया आघाडीत फूट पडली असून, महाविकास आघाडीत नेमके काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच आता जागावाटपावरून वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी सूचक विधान केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जिथे जिथे पक्षाची जिल्हा कार्यकारिणी आग्रही आहे, त्यांनी आपले मनोगत पक्षाच्या अध्यक्षांकडे कळवलेले आहे. त्यानुसार आग्रही जागांचा क्रम करून महाविकास आघाडीतील त्या त्या पक्षांसोबत बोलणी करणार आहोत. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः इच्छूक नाही. पण पक्षाला ती जागा लढायची आहे. नगर जिल्ह्यातील जागा लढायच्या आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
...तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी बोलू शकत नाही
महाविकास आघाडीचे पक्ष आधी त्यांच्यात वाटप करून घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांचे जागावाटप निश्चित झाले की, आम्हाला ज्या जागा हव्या आहेत, त्या आम्ही एक एक पक्षाशी बोलून ठरवणार. म्हणजेच काँग्रेसकडील जागा हवी असेल तर काँग्रेसशी बोलणार. आम्हाला हव्या असलेल्या जागा शिवसेना ठाकरे गटाकडे असतील, तर त्यांच्याशी चर्चा करणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे असलेल्या जागांपैकी जागा आम्हाला हवी असेल, तर तशी चर्चा करणार. त्यामुळे आता यांची बोलणी अंतिम होत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी बोलू शकत नाही. जागावाटपाच्या चर्चेत सहभागी करून घेतले नसले तरी त्याचे आम्हाला दुःख नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देवाने आदेश दिल्याने राम मंदिर बांधले आणि प्राणप्रतिष्ठेसाठी गेलो, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हीच प्रचाराची सुरुवात आहे. आता सुरुवातच खोटेपणाने केली आहे. उरलेला खोटारडेपणा ओळखलेला अधिक बरा, असे मी मानतो, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.