Ratnagiri Barsu Refinery: गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप-शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. कोकणाची वाट लावू नका, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे.
कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरात क्रूड ऑईल रिफायनींग करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलियम उद्योग ही रिफायनरी प्रस्तावित आहे. या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी माती परीक्षण करण्याची सुरुवात झाली आहे. मात्र, स्थानिक गावकऱ्यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. माती परीक्षणावरुन स्थानिक आणि पोलिसांमध्ये वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कोकणाची वाट लावू नका, आजही ९५ टक्के शुध्द ऑक्सिजन
कोकणातील बारसू रिफायनरीला आमचा विरोध आहे. एनरॉन घालवण्यात आमची मोठी भूमिका होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझे आवाहन आहे की, कोकणाची वाट लावू नका. कोकणात आजही ९५ टक्के शुध्द ऑक्सिजन आहे. इथले वातावरण अत्यंत शुद्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती व प्राणी इथे नव्याने जन्माला येतात. त्यामुळे ही शुद्धता तशीच टिकली पाहिजे. राहिला कोकणातील लोकांच्या जगण्याचा प्रश्न, तर मी सर्वांना आठवण करून देईन की, अंतुले मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, पूर्ण वेळ मिळाला तर मी कोकणचा कॅलिफोर्निया करू शकतो. ते खोटे नव्हते. परंतु, जेव्हा त्यांनी हा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात आले, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
तेलंगणाप्रमाणेच इथल्या माणसाचे मासिक उत्पन्न वाढू शकते
प्रदूषणकारी उद्योग आणण्यापेक्षा इथल्या नैसर्गिक संपत्तीचे व्यवस्थित नियोजन केले आणि त्याच्याशी संबंधित कोकणी माणसाच्या उद्योगांना चालना दिली तर तेलंगणाप्रमाणेच इथल्या माणसाचे मासिक उत्पन्न वाढू शकते, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी काही ट्विट्स केली आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"