VBA Prakash Ambedkar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या बैठकांना वेग आला आहे. सर्वच पक्ष राज्यभरात दौरे, बैठका यावर भर देत आहेत. लोकसभेची लय विधानसभेत कायम राहील, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. तर विधानसभा निवडणुकीत कमबॅक करत सत्ता राखण्याचे आव्हान महायुतीकडे असणार आहे. यातच या दोन्ही आघाड्यांशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष स्वतंत्र चूल मांडताना दिसत असून, या विधानसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी सूचक विधान केले आहे.
लोकसभेला काँग्रेसला पाठिंबा दिला होता. तेव्हा काँग्रेसने फोन करून आमच्याकडे पाठिंबा मागितला होता. परंतु, आता विधानसभेत आमचा कोणालाही पाठिंबा नसेल. वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्ष मिळून एकत्र निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे केवळ आमच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ, दुसऱ्या कोणालाही नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
फडणवीस-ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का?
देवेंद्र फडणवीस असतील, ठाकरे गट, आदित्य ठाकरे असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, राज्यांतील बड्या नेत्यांविरोधात उमेदवार देणार का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. यावर, कोण मोठा आणि कोण छोटा हे जनता ठरवत असते. संबंधित मतदारसंघात जे कोणी इच्छुक उमेदवार असेल, त्यांचा अभ्यास करून आम्ही योग्य उमेदवार देऊ. तो मोठा आहे की लहान, हे आम्ही बघणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहोत. या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देणार नाही. वंजित बहुजन आघाडी आणि आमच्या आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांनाच आम्ही पाठिंबा देऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ते टीव्ही९ शी बोलत होते.