Prakash Ambedkar And Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले जात आहे. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होत होता. प्रकृती खालवली असली तरी जरांगे यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तपासणी करण्यास नकार दिला. असे असताना दुसरीकडे राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना आगामी लोकसभानिवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.
सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मराठा समाजाचा प्रश्न हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. शासानाने कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन निर्णय काढला होता. शिंदे समितीमार्फत आमचे काम चालू आहे, असे सरकारकडून सांगितले जात आहे. लोकसभेची निवडणूक संपल्यावर या प्रश्नाकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष होईल. सत्तेतवर राहिलेल्या मराठ्यांनी या प्रश्नाला डावलेले आहे. लोकसभा, विधानसभेची निवडणूक झाली की पुन्हा या समस्येकडे दुर्लक्ष करता येईल, असा त्यांचा विचार आहे. त्यामुळेच मनोज जरांगेंनी लोकसभेची उमेदवारी जाहीर करावी, असा निरोप आम्ही त्यांच्याकडे पाठवलेला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते मीडियाशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी
आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली. आता आरक्षण मिळवण्याचा भाग आहे असे आम्ही मानतो. जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता स्वतंत्रपणे लढवली पाहिजे. कोणत्याही पक्षाच्या आधाराने लढले, तर त्या पक्षांची बंधने येतात आणि बंधने असली की, गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी. मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो, हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. ते मान्य करतील अशी अपेक्षा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गरीब मराठ्यांचे आणि ओबीसींचे ताट वेगळे हवे, पक्षाच्या वतीने आम्ही भूमिका जाहीर केली आहे की, ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तसे झाले तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही. म्हणून गरीब मराठ्यांचे ताट आणि ओबीसींचे ताट वेगळे असावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.