VBA Prakash Ambedkar ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताच आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत सिंह यांची भाषा बदलली आणि त्यांनी इंडिया आघाडीला धक्का देत एनडीए प्रवेशाचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसंच महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीला एक तारीख सुचवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी आणि राज्य पातळीवर महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याबाबत अनुकूलता दर्शवली असली तरी जोपर्यंत जागावाटपावर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत याबाबत निश्चितता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अशातच नितीश कुमार यांच्या जेडीयूनंतर आता जयंत सिंह यांचा आरएलडी पक्षही इंडियातून बाहेर पडल्याने प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, "सध्या महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांमध्ये सुरु असलेल्या वाढत्या संघर्षाच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. तरीसुद्धा माझी आणि वंचित बहुजन आघाडीची (VBA) भूमिका महाविकास आघाडीसाठी कायम आहे आणि राहील. राष्ट्रीय लोक दल (RLD) आज इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याने, कॉंग्रेसच्या राजकीय समावेशकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडी इंडिया अलायन्सप्रमाणे संपुष्टात येणार नाही, अशी मला अजूनही आशा आहे," असं आंबेडकर म्हणाले.
"भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य असून, याच हेतूने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना ३९ कलमी किमान समान कार्यक्रम दिला आहे. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीला एक तारीख सुचवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे," असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.