"वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा", नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 01:39 PM2023-06-22T13:39:51+5:302023-06-22T14:40:10+5:30
Nana Patole's letter to Eknath Shinde: मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रातच व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबई - महाराष्ट्र राज्य गुतंवणुकीसाठी देशात आघाडीचे राज्य आहे. परदेशी गुतंवणीसाठीही महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मागील वर्षात काही महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र आता एक संधी महाराष्ट्रासाठी चालून येत आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने २२ हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब होईल. मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रातच व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणतात की, महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर चीपचा प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून १. ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती व लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार होते. तसेच पूरक उद्योगांमधूनही मोठया प्रमाणात रोजगार मिळणार होते पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. ते नुकसान भरून काढण्यासाठी मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रात व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करायला हवेत.
महाराष्ट्रातील पुणे परिसरात या प्रकल्पासाठी अत्यंत अनुकुल वातावरण आहे. पुणे हे औद्योगीक क्लस्टर असून विमानतळ, बंदरे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, त्यांना आवश्यक सोयी सुविधा या परिसरात उपलब्ध आहेत. त्यामुळे गुंतवणूक करणा-या कंपनीसाठी इथे प्रकल्प लवकर उभा करून उत्पादन सुरु करणे सोपे होणार आहे.