ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - भारत- पाकिस्तान सामना आपल्या राज्यात खेळू देण्यास नकार देणा-या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कौतुक करत महाराष्ट्रतील नेत्यांनीही यातून धडा घ्यावा असा टोला हाणला आहे. धरमशाला येथे रद्द होणार्या पाक सामन्यांचे आयोजन महाराष्ट्रात करू व चोख बंदोबस्त देऊ अशी एखादी आरोळी जालन्यातून किंवा नागपुरातून उठू नये, 'हिमाचलमध्ये वीरभद्र व महाराष्ट्रात अभद्र' असे यापुढे तरी घडू नये असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांवर टीका केली आहे.
पाकिस्तानमुळे भारतीय जवानांचे रक्त सांडत असताना आपण त्यांच्या क्रिकेटच्या प्रेमात का पडत आहोत? सैनिकांचे बलिदान पायदळी तुडवून कुणास पाकड्यांच्या क्रिकेट प्रेमास गोंजारत बसायचे असेल त्याने देशभक्तीवर प्रवचने झोडण्याची गरज नाही, अशी टीकाही उद्धव यांनी केली. जे राज्यकर्ते व जे जुगारी क्रिकेटवाले पाकिस्तानबरोबरचा एखादा क्रिकेट सामना, पाकड्या कलाकारांच्या मैफली लाथाडू शकत नाहीत त्यांच्याकडून देशवासीयांनी काय अपेक्षा करावी? असा सवालही त्यांनी विचारला आहे. कांगडाची भूमी ही शहीद सैनिकांच्या भावनांचे प्रतीक आहे व त्याच भावना हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी या भावनांवर चिंतन केले तर आपल्या राज्यातील शहीद सैनिकांचे आत्मे महाराष्ट्रावर पुष्पवृष्टी करतील.
जेएनयूमध्ये देशद्रोहाचे नारे लावणार्यांच्या विरोधात निवृत्त सैनिकांनी एक मोर्चा दिल्लीत काढला. या जर देशभावना असतील तर मग कांगडातील सैनिक व शहिदांच्या कुटुंबीयांच्या भावना म्हणजे पालापाचोळा नाही हेसुद्धा समजून घेतले पाहिजे असे सांगत देशभावना म्हणजे सोयीचे राजकारण करण्यासाठी निर्माण होणारे बुडबुडे नव्हे असे उद्धव यांनी म्हटले.
काय म्हटले उद्धव यांनी अग्रलेखात ?
- हिंदुस्थान-पाकिस्तानातील क्रिकेट सामना आपल्या राज्यात खेळवायला त्यांनी साफ नकार देणारे हिमाचल प्रदेशचे ‘काँग्रेजी’ मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे आम्ही अभिनंदन करीत आहोत. ‘टी-२०’ विश्वकप क्रिकेटमधील हा सामना धरमशाला येथील स्टेडियमवर खेळवला जाणार होता; पण हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुस्थान-पाक सामन्यास सपशेल विरोध दर्शवला. पाकिस्तानच्या बाबतीत इतके भयंकर घडूनही आपण त्यांच्या क्रिकेटच्या प्रेमात का पडत आहोत? हा प्रश्न देशाला सतावीत आहे. पठाणकोटच्या जखमा व आपले सांडलेले रक्त ताजे आहे. कश्मीर खोर्यात पाकड्यांमुळे आमच्या सैनिकांचे बलिदान सुरूच आहे. त्या बलिदानाला पायदळी तुडवून कुणास पाकड्यांच्या क्रिकेट प्रेमास गोंजारत बसायचे असेल तर त्यांनी देशभक्तीवर प्रवचने झोडण्याची गरज नाही. तुमची देशभक्तीची भेसळ तुमच्याकडेच ठेवा व देशाला सैनिकांच्या हवाली करा. जे राज्यकर्ते व जे जुगारी क्रिकेटवाले पाकिस्तानबरोबरचा एखादा क्रिकेट सामना, पाकड्या कलाकारांच्या मैफली लाथाडू शकत नाहीत त्यांच्याकडून देशवासीयांनी काय अपेक्षा करावी? हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र यांनी जी भावना व्यक्त केली ती देशवासीयांची भावना आहे.
- राज्य सरकार पाकड्यांच्या क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्षा पुरवू शकत नाही, मॅचच्या दरम्यान काही बरे-वाईट घडले तर त्यास राज्य सरकार जबाबदार नाही, त्यामुळे पाकड्यांचा क्रिकेट सामना आमच्या राज्यात होणे कठीण आहे असे वीरभद्र यांनी केंद्राला स्पष्टपणे कळवले. हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे जे मनोगत व्यक्त केले ते पहा, ‘‘जेथे हा पाकड्यांबरोबरचा क्रिकेट सामना होणार आहे त्या कांगडा भागात मोठ्या संख्येने सैनिक व त्यांची कुटुंबे राहतात. कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बात्रा व सौरभ कालियासारखे युद्धभूमीवरचे हिंदुस्थानी ‘हीरो’ याच भागातले आहेत. अशा वेळी पाकड्यांसाठी येथे स्वागताचे गालिचे अंथरणे हा त्या सैनिकांचा व शहिदांचा अपमान ठरेल. आम्ही शहिदांचा सन्मान करतो. त्यामुळे पाकड्यांचे स्वागत करण्याचे पाप हातून कसे घडावे?’’ असा भावनिक विचार मांडून त्यांनी भारतीय जनता पक्षासमोर धर्मसंकटच उभे केले.
- भाजपचे धुरंधर नेते व हिमाचलचे माजी मुख्यमंत्री शांताकुमार यांनीही सैनिकांच्या भावनांचा आदर करा व पाकबरोबरचा क्रिकेट सामना होऊ देऊ नका असे बजावले आहे. धरमशालेस पाकड्यांचें पाय लागू नयेत व ही पवित्र भूमी नापाक होऊ नये अशीच एकंदरीत भावना आहे. जेएनयूमध्ये देशद्रोहाचे नारे लावणार्यांच्या विरोधात निवृत्त सैनिकांनी एक मोर्चा दिल्लीत काढला. या जर देशभावना आहेत तर मग कांगडातील सैनिक व शहिदांच्या कुटुंबीयांच्या भावना म्हणजे पालापाचोळा नाही हेसुद्धा समजून घेतले पाहिजे. देशभावना म्हणजे सोयीचे राजकारण करण्यासाठी निर्माण होणारे बुडबुडे नाहीत.
- कांगडाची भूमी ही शहीद सैनिकांच्या भावनांचे प्रतीक आहे व त्याच भावना हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी या भावनांवर चिंतन केले तर आपल्या राज्यातील शहीद सैनिकांचे आत्मे महाराष्ट्रावर पुष्पवृष्टी करतील. पाकड्यांचा नेता मेहमूद कसुरी व गुलाम अलीसारख्यांचे पुळके येऊन त्यांना पायघड्या घालण्याचे उद्योग आता तरी बंद व्हावेत. कांगडात रद्द होणार्या पाक सामन्यांचे आयोजन महाराष्ट्रात करू व चोख बंदोबस्त देऊ अशी एखादी आरोळी जालन्यातून किंवा नागपुरातून उठू नये म्हणजे झाले. कांगडाचे कॅ. विक्रम बात्रा, सौरभ कालिया शहीद झाले तसे महाराष्ट्रातही कर्नल संतोष महाडिक, शंकर शिंदे, सहदेव मोरेसह असंख्य ‘वीर’ पाकड्यांशी लढताना शहीद झाले आहेत. हिमाचलात वीरभद्र व महाराष्ट्रात अभद्र असे यापुढे तरी घडू नये. पायघड्या घालण्याआधी हे पाकडे तुमचे कोण लागतात याचे उत्तर प्रत्येकाने द्यावे!