सातारा : उरमोडीच्या खोऱ्यात ज्याच्याबरोबर मोठे झालो त्या संतोषने मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिलं. आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताना एका बाजूला प्रचंड दु:ख आहे, तर दुसरीकडे अभिमानाने छाती फुलून आलीय. ‘शहीद संतोष अमर रहे’ च्या घोषणा देताना परळी खोऱ्यातील तरुणांच्या मनात हेच विचार येत होते. संतोषप्रमाणेच देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊनच! विशेष म्हणजे संरक्षणमंत्री मनोहर पर्लीकर यांच्यासमोर शहीद संतोषच्या वीरपत्नीने निर्धार केला की, ‘माझी दोन्ही मुलंही मोठेपणी लष्करातच दाखल होतील. देशाची सेवा करतील.’सकाळी सात वाजता साताऱ्यातून कर्नल संतोष यांचं पार्थिव पोगरवाडीकडे रवाना झालं त्या क्षणापासूनच बोगदा ते पोगरवाडी रस्त्यावरील गावागावात उत्कंठा शिगेला पोहोचली होती. पार्थिवाची प्रतीक्षा करणाऱ्यांमध्ये तरुण आणि महिलांची संख्या मोठी होती. पार्थिवासह वाहनांचा ताफा डबेवाडी, भोंदवडे अशा गावांजवळून जसजसा पुढे सरकत होता, तसतसा अंत्ययात्रेतील तरुणांचा सहभाग वाढत गेला. पोगरवाडीतील ग्रामस्थ या भूमिपुत्राची प्रतीक्षा डोळ्यात प्राण आणून करीत होते. आरे गावात थोडा वेळ थांबल्यानंतर वाहनांचा ताफा पोगरवाडीकडे निघाला. उरमोडी नदीवरील पुलाजवळ पारंपरिक वाद्यांचे पथकही सहभागी झाले. प्रत्येक घरासमोर या सुपुत्राला अभिवादन केलं जात होतं. संतोष यांची प्राथमिक शाळा, ग्रामदैवताचं मंदिर या मार्गावरून अंत्ययात्रा न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणासमोर थांबली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू असताना भागातील तरुण त्वेषानं घोषणा देत होते. लष्करी जवानांची मानवंदना, मान्यवरांची आदरांजली, धार्मिक विधी आणि मुखाग्नी हे सारे सुरू असताना पार्श्वभूमीला परळी खोऱ्यातील तरुणांच्या घोषणा निनादत राहिल्या. (प्रतिनिधी)अंकुश-संतोष तुम्हारी जोडी...संतोष महाडिक यांच्यापूर्वी याच गावातील अंकुश घोरपडे या जवानाने २००१ मधील ‘आॅपरेशन पराक्रम’ सुरू असताना हौतात्म्य पत्करलं. त्याचं स्मरण गावकऱ्यांना या निमित्तानं होत होतं. इतर घोषणांबरोबरच ‘अंकुश-संतोष तुम्हारी जोडी... याद रखेगी पोगरवाडी’ ही घोषणा लक्षवेधी ठरली. याबरोबरच पाकपुरस्कृत दहशतवादाबद्दलचा संतापही घोषणांमधून डोकावत होता. ‘जवाब दो, जवाब दो... पाकिस्तान जवाब दो,’ ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा तरुण मुठी आवळून देत होते. ‘भारत माता की जय,’ ‘वंदे मातरम’ या घोषणांनी परिसरातील वातावरण भारलेलं होतं. इवला जीव सैरभैरमोठी गर्दी, कुटुंबातील साऱ्यांचे रडणे, अशा वातावरणात शवपेटीला पुष्पचक्र अर्पण करणारे आणि हवेत फैरी झाडणारे जवान, नागरिकांच्या घोषणा, धार्मिक मंत्र आणि बिगुलाचा आवाज... हे सारं पाहून कर्नल संतोष यांचा अवघ्या सहा वर्षांचा मुलगा स्वराज सैरभैर झाला होता. काकासोबत अंतिम विधी पार पाडताना त्याला काहीच समजत नव्हतं. त्याचा केविलवाणा चेहरा उपस्थितांच्या डोळ्यांवर आघात करीत होता.आधार कसा शोधावा...कर्नल संतोष यांच्या हौतात्म्याची बातमी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांना समजली. पत्नी आणि मुले संतोष यांच्यासोबत उधमपूरला वास्तव्यास असल्यामुळं त्यांना खूपच आधी ही बातमी समजली. त्या क्षणापासून अंत्यसंस्कार होईपर्यंत दु:ख, आठवणी आणि प्रदीर्घ प्रवास यामुळं संतोष यांच्या पत्नी स्वाती यांच्यावर आलेला ताण स्पष्ट जाणवत होता. लष्करी मानवंदना आणि धार्मिक विधी सुरू असताना त्या आधार शोधत होत्या. मुलगी कार्तिकी कायम त्यांना बिलगून होती आणि स्वाती यांनीही तिला घट्ट धरून ठेवलं होतं. जणू तिच्यातच त्या आधार शोधत होत्या...मान्यवरांची उपस्थितीदेशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शहीद कर्नल संतोष यांना अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली. याव्यतिरिक्त अनेक मान्यवर अंत्यसंस्कारास उपस्थित होते. यात खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे शाहू महाराज, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, नौदलाचे महाराष्ट्र फ्लॅग आॅफिसर रिअर अॅडमिरल मुरलीधर पवार यांचा प्रामुख्याने समावेश होता.गावात चूल पेटलीच नाही...शहरापासून गावाच्या चौकापर्यंत श्रद्धांजलीचे फ्लेक्स... ग्रामस्थांच्या वेगवान हालचाली; पण गावात भयाण शांतता... लष्करी शिस्तीने जणू अवघ्या गावाचा ताबा घेतलेला... छोट्यांपासून वयोवृद्धांच्या नजरेत पार्थिवाची प्रतीक्षा... शेतात राबणारे हात अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढून फुलांचा सडा टाकत होते. लहानगं मूल रडतंय म्हणून माउलीनं घरातील शिळ्या भाकरीचा तुकडा हातावर ठेवला आणि म्हणाली, ‘बाळा अजून कुणीबी चूल न्हाय पेटवली. नगं रडूस, खा वायच. हे समदं झालं की मंग देते तुला च्या अन् कानावला!’ या वाक्यामुळे समजलं पोगरवाडीत शहिदाला अभिवादन केल्याशिवाय चूल पेटलीच नाही.सार्वजनिक पाण्याची सोयशहीद कर्नल संतोष यांना अभिवादन करण्यासाठी मान्यवरांसह सामान्य नागरिकही पोगवाडीत येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याची सोय येथील ग्रामस्थांनी केली होती. सकाळपासून सार्वजनिक नळाचे पाणी सुरू होते. त्याबरोबरच अनेकांनी घराबाहेर पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.
वीरपत्नीचा निर्धार, ‘मुलंही लष्करात!’
By admin | Published: November 19, 2015 11:14 PM