लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शेतकरी आंदोलनामुळे विस्कळीत झालेला भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होत असून, बुधवारी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात सरासरीच्या ९३ टक्के भाजीपाल्याची आवक झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले. त्यामुळे भाजीपाल्याचे दर टिकून आहेत; तसेच दुधाचा पुरवठादेखील पूर्ववत झाल्याचे दूध वितरकांनी सांगितले. बाजारात टोमॅटो वगळता सर्वच भाज्यांना चांगली मागणी होती. सोमवारी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी बंद केल्यामुळे, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाल्याची आवक सरासरीच्या पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत खाली आली होती. बुधवारी ३९ ट्रकसह ८८८ गाड्यांतून ३१ हजार ९७१ क्विंटल भाजीपाला आणि भुसार बाजारात १८५ वाहनांतून १२ हजार ६२८ क्विंटल धान्याची आवक झाली. पिंपरी, मोशी, उत्तमनगर, खडकी आणि मांजरी येथील उपबाजारत सरासरीपेक्षा अधिक भाजीपाल्याची आवक झाली होती. फूलबाजारात ७१० क्विंटल (७१ टक्के) फुलांची आवक झाली. दूधसंकलन वाढले बुधवारी दूध वितरण सुरळीत झाल्याची माहिती पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज) व्यवस्थापकीय संचालक विवेक क्षीरसागर यांनी दिली. आंदोलनामुळे कात्रजचे दूधसंकलन २.२५ लाख लिटरवरून ८० हजार लिटरपर्यंत खाली आले होते.
भाजी, दूधपुरवठा सुरळीत
By admin | Published: June 08, 2017 12:54 AM