नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या व्यापारावरही होऊ लागला आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची दरवाढ सुरूच आहे. वाटाणा किरकोळ मार्केटमध्ये प्रतिकिलो १५० ते १६० रूपयांवर तर गवार १०० ते १२० रूपयांवर पोहोचली आहे.मुंबई बाजार समितीमध्ये ऑक्टोबरच्या सुरूवातीपासूनच दरवाढ सुरू झाली आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. मागणीच्या तुलनेमध्ये बाजारपेठांमध्ये आवक कमी होत आहे. मुंबई बाजार समितीत सद्य:स्थितीमध्ये ४५० ते ५०० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. नाशिक, पुणे, सातारा व इतर ठिकाणांवरून कृषी माल विक्रीसाठी येत आहे. खरेदीच्या ठिकाणीच मालाची किंमत वाढल्यामुळे बाजार समितीमध्येही दर वाढत आहेत.
पुढील दोन ते तीन दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण वाढले तरी पिकांचे नुकसान होऊन दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० ते ६०, बीट ८०, गाजर ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. गवार १०० ते १२०, दोडका ६० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.