मुंबई/ नवी मुंबई : कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका भाज्या आणि दूध संकलानवर झाला आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील भाज्यांची आवक घटली असून भाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. तसेच दूध संकलनावरही त्याचा परिणाम झाला आहे.मुंबईत नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. परंतु येथून भाज्यांच्या अनेक गाड्या महामार्गावरच अडकल्या आहेत. ज्या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे, तिथून भाज्या अत्यल्प प्रमाणात शहरात येतात. भाजीपाला पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली असून सर्वच पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे भाजीपाल्याच्या गाड्या येत नसल्याने दर वाढले आहेत, असे चेंबूर येथील भाजी विक्रेता मंगल चव्हाणके यांनी सांगितले. पावसामुळे झालेली दरवाढ बघून काही ग्राहक वाद घालतात तर काही जण समजून घेतात, असे दादर येथील भाजी विक्रेता देवमा ओलंगडी यांनी सांगितले. जी मेथीची जुडी ३० ते ४० रुपयांना मिळत होती ती आता ७० ते ८० रुपयांना मिळत आहे, असे ग्राहक गीता मणिशंकर म्हणाल्या.तर, नवी मुंबई बाजार समितीमध्ये बुधवारी सकाळी ९७ ट्रक व ६१६ टेम्पो अशी ७१३ वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. अचानक आवक वाढली असली तरी बाजारभाव तेजीतच असल्याचे पाहावयास मिळाले. होलसेल मार्केटमध्ये फरसबी ८० ते १२० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये २२० ते २४० रुपये किलो दराने विकली जात होती. होलसेल मार्केटमध्ये भेंडीचे दर ३० ते ५० रुपये किलो झाले आहेत.तर, मुंबईमध्ये सरासरी १३ लाख लीटर दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गोकूळ व वारणा कंपनीवर झाला आहे. मुंबई, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये या दोन्ही ब्रॅण्डच्या दुधाला मोठी मागणी आहे. फक्त गोकूळचे आठ लाख लीटर दूध मुंबईमध्ये विक्रीसाठी येते. कोल्हापूर परिसरातील पुरामुळे दुधाचे टँकर येऊ शकले नाहीत. यामुळे अनेक ग्राहकांना दूध उपलब्ध झाले नाही. किरकोळ दूधविक्रेत्यांनी इतर ब्रॅण्डचे दूध उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबईमधील अनेक हॉटेल व चहाच्या स्टॉलवरही दुधाची टंचाई निर्माण झाली होती. यामुळे सीवूड व इतर ठिकाणी दूध उपलब्ध नसल्यामुळे दुकान बंद ठेवण्यात आल्याचे फलक लावण्यात आले होते. दोन प्रमुख कंपन्यांचे दूध आले नसल्याचा लाभ इतर दूध कंपन्यांना झाल्याचे पाहायला मिळाले....तर भाजीपाला आणखी महागणारभाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाजी महाग झाली आहे; परंतु जर भाजीपाल्याचा पुरवठा आणखी काही दिवसांत सुरळीत झाला नाही, तर भाजीपाल्याचे दर आणखी वाढू शकतात. - ई शंकर, भाजी विक्रेता, चेंबूरकोल्हापूर भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे दूध संकलन व वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गोकूळचे प्रतिदिन ८ लाख लीटर दूध मुंबईत येत असते. दोन दिवसांपासून दूध येऊ शकले नाही. शुक्रवारीही दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.- सुनील कडूकर, अधिकारी गोकूळकोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून येणारे गोकूळ, वारणा व इतर कंपन्यांचे दूध मुंबईत येत नाही. यामुळे इतर ब्रँडच्या दुधाला मागणी वाढली आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.- एकनाथ सातपुते, दूध वितरक, नवी मुंबई
भाज्यांचे दर दुपटीने वाढले; दुधाचा प्रचंड तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 3:07 AM