पुणे : श्रावण महिन्यामुळे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने बहुतेक सर्वच फळभाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरचीने ग्राहकांना झटका देण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ बाजारात दोन्ही भाज्यांचे भाव प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांच्या पुढे गेले आहेत. इतर फळभाज्यांचे भाव ४० ते ५० रुपयांच्या जवळपास आहेत. पालेभाज्यांनी मात्र ग्राहकांना दिलासा दिला आहे.मागील काही दिवसांपासून सर्वदूर पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तसेच अनेक भागांत पेरण्यांची कामे सुरू असून शेतकरीवर्ग त्यातच गुंतला आहे. त्यामुळे भाज्यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. या काळात भाज्यांची लागवड काही प्रमाणात कमी होते. तसेच पावसामुळे त्याची काढणीही करताना अडचणी येतात. जास्त पावसामुळे पालेभाज्यांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पालेभाज्या फार काळ टिकत नाहीत. त्यातच तीन दिवसांपासून श्रावण महिना सुरू झाल्याने भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी आणि आवक याचे समीकरण बिघडल्याने सध्या बहुतेक भाज्यांचे भाव वाढू लागले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सध्या भाज्यांची आवक सुमारे २० टक्क्यांनी कमी होत आहे. सुमारे ७० ते ८० ट्रकएवढीच आवक होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात किरकोळ विक्रेत्यांना चढ्या भावाने भाज्यांची खरेदी करावी लागत आहे.घाऊक बाजारातील भाव व किरकोळ बाजारातील भावांत मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. काही भागांत किरकोळमध्ये टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ७० ते ७५ रुपये, तर हिरवी मिरचीची ८० ते ८५ रुपयांनी विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात हे भाव साधारणपणे प्रतिदहा किलोमागे अनुक्रमे ५०० ते ६५० आणि ३५० ते ४०० रुपये एवढा आहे. हिरवी मिरचीमध्ये खराब मालाचे प्रमाण अधिक असल्याने भाव अधिक असल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. ‘श्रावण महिना सुरू झाल्यानंतर दरवर्षी भाज्यांचे भाव वाढतात. तरीही यंदा मागील महिन्यात पावसाने दिलेली ओढ आणि काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.फळभाज्यांचे भाव तेजीत असले तरी ग्राहकांना पालेभाज्यांनी दिलासा दिला आहे. आवक चांगली होत असल्याने बहुतेक पालेभाज्यांचे भाव आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथीसह बहुतेक भाज्यांची विक्री जुडीमागे १० ते १५ रुपयांनी होत आहे. कांदा पातीचे भाव केवळ २० ते २५ रुपयांपर्यंत आहेत.
फळभाज्या महागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 6:53 AM