औरंगाबाद : शंभर रुपयांत लोडिंगरिक्षा भरुन मेथी, पालकाच्या भाज्या विक्रेत्यांनी खरेदी केल्या. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक अचानक वाढल्याने दरही घसरले. या मातीमोल दरात ग्राहकांना भाज्या विकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात मंगळवारी पालेभाज्यांची आवक अतकी वाढली की, ५० पैशांत मेथीची गड्डी विकणे शेतकऱ्यास भाग पडले. पिसादेवी येथील रामेश्वर मोहिते यांनी त्यांच्याकडील मेथीच्या १३०० गड्डी अवघ्या १०० रुपयांत विकल्या. या भाज्याने एक लोडिंगरिक्षा भरुन गेली. विक्रेत्याने १०० ची नोट हातात दिली तेव्हा मोहिते यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. मोहितेंसारखे ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मातीमोल भावात पालेभाज्यांची विक्री कराव्या लागली. सकाळी अडत बाजारात ८० रुपये शेकडाने मेथी विक्री झाली. तसेच पालक ८० रुपये, कोथिंबीर ६० ते ७० रुपये, करडी ४० ते ६० रुपये व शेपू १०० रुपये प्रति शेकडा विक्री झाल्या. यावेळी किरकोळमध्ये १० रुपयांत ५ गड्डी भाज्या विकल्या जात होत्या. पण जसजशी दुपार होत गेली तसतसे पालेभाज्यांचे भाव आणखी घसरत गेले. १२ वाजता १० रुपयांत १० गड्ड्या विकल्या त्यानंतर जे भाव मिळतील त्या भावात पालेभाज्या विक्री करण्यास शेतकरी तयार झाले होते. १०० रुपयांत १३०० गड्ड्या विक्री करुन मोहिते गावाकडे निघून गेले. यानंतर काही शेतकरी त्यांच्याकडील शिल्लक पालेभाज्या तिथेच टाकून निघून गेले. (प्रतिनिधी)यंदा पाणी कमी असल्याने गहू,ज्वारी, हरभरा ऐवजी पालेभाज्याकडे शेतकरी वळाले. मात्र, येथेही दुर्दैव आड आले एकदम आवक झाल्याने पालेभाज्या मातीमोल भावात विकाव्या लागत असल्याचे पिसादेवीचे शेतकरी रामेश्वर मोहिते यांनी सांगितले.शेतातून मेथी काढणीसाठी ४० रुपये शेकडा मजूरी द्यावी लागते. यानंतर १ हजार गड्डी बाजारात आणण्यासाठी २०० ते ३०० रुपये खर्च येतो. आज वाहतूक खर्चही निघाला नाही. शिल्लक मेथी अखेर टाकून द्यावी लागली असे मांडकीचे शेतकरी सुभाष डग यांनी सांगितले.
शंभर रुपयांत रिक्षा भरुन भाज्या!
By admin | Published: January 07, 2015 1:48 AM