मुंबई : रेल्वे ट्रॅकच्या कडेला पिकविण्यात येणाऱ्या भाजीपाला पिकविण्यासाठी कोणते पाणी वापरले जाते, हा भाजीपाला खाण्यायोग्य असतो का, त्याने काही अपाय होतो का, असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. हाच प्रश्न विधान परिषदेतील काही सदस्यांना पडला आहे. भाजी लागवडीसाठी सांडपाणी वापरले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी कुबली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला लेखी उत्तरही दिली आहे. रेल्वे मार्गालगत भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी सांडपाण्याचा वापर केला जात असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, किरण पावसकर, नरेंद्र पाटील, विद्या चव्हाण आदी सदस्यांनी विचारला होता. या भाज्या आरोग्यास अपायकारक व घातक असून त्यामुळे पोटाचे विकार तसेच कॅन्सर, डायबेटीज आदी गंभीर आजार होत असल्याचा दावा या प्रश्नात करण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तरात रेल्वे ट्रॅकलगतच्या भाजी लागवडीसाठी सांडपाणी वापरले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी कबुलीच दिली. मात्र यापुढे भाजीपाला लागवडीसाठी स्वच्छ पाणीच वापरले जाईल याची खबरदारी घेऊनच लागवडीसाठी परवानगी द्यावी, अशा सूचना राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. रेल्वे मार्गात लगत असणा-या रेल्वेच्या अखत्यारीतील भूखंडावर अतिक्रमण होऊ नये म्हणून रेल्वेने आपल्या इच्छुक कर्मचा-यांना काही शुल्क आकारून भाजीपाल्याची लागवडीस परवानगी दिली आहे. अनेक वर्षांपासून अशी लागवड सुरु आहे. या जागेवर भाजीपाला पिकविताना शेजारुन वाहणा-या नाल्याचे पाणी वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या पालेभाज्यांमुळे कँसर, मधुमेह किंवा अन्य गंभीर रोग होत असल्याचा कोणताच ठोस आणि शास्त्रीय पुरावा समोर आलेला नाही. अथवा तशा तक्रारही पालिकेकडे आलेली नाही, असे या लेखी उत्तरात म्हटले आहे.
मुंबईत सांडपाण्यावर भाजीपाला
By admin | Published: March 16, 2017 12:23 AM