संदीप प्रधान, मुंबईमहाराष्ट्रात आतापर्यंत सर्रास वाहन चालवण्याचे परवाने दिले जात होते. पुण्यातील भोसरी येथे कॉम्प्युटराईज ट्रॅकवर वाहन चालकाची परीक्षा घेण्यास सुरुवात झाल्यावर ४० टक्के लोक नापास होऊ लागले आहेत. त्याचबरोबर नाशिक येथे आॅटोमेटेड टेस्ट ट्रॅकवर वाहनांची तपासणी सुरु केल्यावर अनेक वाहने चालवण्यास अयोग्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे यापुढे वाहनाची आणि चालकांची केवळ संगणकाद्वारे तपासणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यामुळे अपघात कमी होतील व भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.वाहन चालवण्याचा परवाना काढायचा तर तेथील अधिकारी आणि एजंट यांच्या संगनमताचा अनुभव येतो. एखादी व्यक्ती वाहन चालवण्याचा परवाना काढायला गेली तर बरेचदा त्याला कोणकोणती कागदपत्रे सादर करायची, याची एकत्र माहिती दिली जात नाही. चार-पाच वेळा खेटे मारल्यावर हेच काम एजंटमार्फत करण्याकरिता सुचवले जाते. एजंटमार्फत गेलेल्यांची वाहन परवाना देण्यापूर्वी बरेचदा परीक्षा घेतली जात नाही किंवा घेतली तरी जुजबी स्वरुपाची असते. अशा पद्धतीने महिनाभरात वाहन चालवण्याचा परवाना दिला जातो. पुणे येथील भोसरीत कॉम्प्युटराईज टेस्ट ट्रॅक सुरु केला आहे. येथे परीक्षा देण्याकरिता आलेल्या व्यक्तीने वाहन चालवल्यावर कॉम्युटर तो पास की नापास झाला ते ठरवतो. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांत ४० टक्के लोकांना नापास ठरवण्यात आले. परिवहन विभागाने वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेतील मानवी सहभाग पूर्णत: थांबवून या क्षेत्रातील भ्रष्टाचार व पर्यायाने अपघाताची संभाव्य शक्यता थांबवण्याकरिता सर्वत्र कॉम्प्युटराईज टेस्ट ट्रॅक सुरु करण्याचे ठरवले आहे.प्रत्येक वाहनाची दरवर्षी तपासणी करणे बंधनकारक आहे. व्यवस्थित तपासणी करून वाहन रस्त्यावर धावण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र देणे त्याकरिता लागणारा वेळ लक्षात घेता अशक्य असल्याचे हे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे मत आहे. त्यामुळे केवळ वरवर पाहून ही प्रमाणपत्रे दिली जातात. ९० टक्के अपघातांमध्ये वाहनाची खराब स्थिती हेच कारण असते. नाशिक येथे आॅटोमेटेड टेस्ट ट्रॅक प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आला आहे. ४५ मिनिटांत एका वाहनाची तेथे तपासणी होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी)ने त्यांच्याकडे असलेल्या जागांवर हे आॅटोमेटेड टेस्ट ट्रॅक उभारायचे असून सर्व वाहनांना त्याच ठिकाणी वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले जाणार आहे.
वाहने, चालकांची संगणकीय तपासणी
By admin | Published: April 20, 2015 3:29 AM