पुणे : प्रत्येक जण दुचाकी किंवा चारचाकीसह कुठलेही वाहन खरेदी करताना प्रचंड उत्साही असतो. त्यातच आपल्या सवारीचा नंबर खास असावा यासाठी हौशे-गवश्यांमध्ये प्रचंड चढाओढ लागलेली असते. काही बहाद्दर तर हाच क्रमांक पाहिजे मिळावा म्हणून कितीही रुपये मोजण्याची तयारीत असतात. एका पट्ठ्याने तर गाडीच्या किमतीपेक्षा जास्त पैसे हे फक्त 'खास' नंबरसाठी चुकते केल्याची देखील घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. पण आता हटके क्रमांक मिळवण्यासाठी पंगतीत असणाऱ्यांसाठी थोडे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. कारण यापुढे तुम्हाला चॉईस नंबरसाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
राज्याच्या गृह विभागाकडून याबाबतची महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. कुठल्याही वाहनाच्या आकर्षक क्रमांकासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात भरघोस वाढ करण्यात आली आहे. पाच हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत ही रक्कम असणार आहे. 'खास' क्रमांक घेण्यासाठी मोठी स्पर्धा असल्याने राज्य सरकारला यामधून कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न मिळत असते.
राज्याच्या गृह विभागाकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या नव्या प्रस्तावानुसार ०००१ हा क्रमांक दुचाकीसाठी आता एक लाख व फोर व्हीलरसाठी ५ लाख रुपये मोजावे लागणार आहे. जो या घडीला दुचाकीला ५० हजार रुपये व चारचाकीला ४ लाखांमध्ये मिळतो. परंतू, राज्याच्या गृह विभागाकडून याबाबतची अधिसूचना काढण्यात आलेली असली तरी त्यावर नागरिकांच्या सूचना-हरकती मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून या हरकती व विचार करून नव्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
एकाच नंबरची मागणी वाढली तर असा काढला जातो पर्याय.. एखाद्या हटके नंबरसाठी जर अधिक वाहनधारकांनी डिमांड केल्यास त्याचा लिलाव करण्यात येतो. आणि यावेळी नियोजित करण्यात आलेल्या रक्मेपेक्षा जास्त पैसे मोजलेल्या व्यक्तीला तो क्रमांक मिळतो.