राजकुमार सारोळे : आॅनलाइन लोकमतसोलापूर दि ५ : वाहनांचे आरसी बुक आता पुन्हा स्मार्ट कार्डच्या स्वरूपात मिळणार आहे. मात्र यावेळेस या स्मार्ट कार्डची किंमत कमी करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून स्मार्ट आरसी बुक वितरण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत आरटीओंची पुण्यात बैठक झाली. या बैठकीत आरटीओ कार्यालयात वाहन परवाना वितरित करण्यात येणाºया अडचणींवर चर्चा झाली. आरटीओ कार्यालयाने वाहन परवाना काढण्यासाठी आॅनलाईन नोंदणी सुरू केल्यापासून चांगला प्र्रतिसाद मिळत आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांना सुविधा केंद्र उपलब्ध होत नाही. त्यासाठी आरटीओ कार्यालयात एक सुविधा केंद्र स्थापन करावे, अशी सूचना अधिकाºयांनी केली. वाहनांचे आरसी बुक स्मार्ट कार्ड स्वरूपात देण्याचा कंपनीबरोबरचा करार संपला होता. त्यामुळे पेपर स्वरूपात आरसी बुक देण्यात येत होते. वाहनधारकांना पेपर स्वरूपातील आरसी बुक सांभाळणे अवघड झाले होते. तसेच अनेक वेळा आरटीओ कार्यालयात असे कागद उपलब्ध न झाल्याने पेपर आरसी वितरणाला सहा महिने विलंब होत होता. आरसी बुक किमान पूर्वीप्रमाणे पुस्तक स्वरूपात द्यावे, अशी मागणी होत होती. पूर्वीचा ठेका असलेल्या कंपनीबरोबर आता नव्याने करार करून एक सप्टेंबरपासून आरसी बुक स्मार्ट स्वरूपात उपलब्ध केले जाईल, असे आयुक्त गेडाम यांनी सांगितले. मात्र यावेळेस ठेकेदाराबरोबर स्मार्ट कार्डची किंमत कमी करण्यात आली आहे. पूर्वी वाहनधारकांकडून स्मार्ट कार्ड आरसीसाठी ३५0 रुपये फी आकारली जात होती. आता मात्र दोनशे रुपयांत स्मार्ट आरसी दिले जाईल. यात ठेकेदाराला ५४.७२ रु. तर उर्वरित रक्कम शासनाला जमा होईल. सोलापूर कार्यालयात स्मार्ट कार्ड वितरणाची यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली.
वाहनांचे आरसी बुक मिळणार पुन्हा स्मार्ट कार्डमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 11:57 AM