पुणे : अयोध्या, बाबरी मशीद प्रकरणावर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून त्यात प्रामुख्याने लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ लोकांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र बाबरी मशीद प्रकरणी सीबीआयने दिलेला निकाल हा देशहिताचा नाही. अशाने लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाईल, असे स्पष्ट मत वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालावर वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. आंबेडकर म्हणाले, बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षड्यंत्र नव्हते. त्यामुळे ३२ लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मात्र, आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल.
६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह ३२ जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण ४९ आरोपी होते. मात्र, यातील १७ जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले होते. दरम्यान, बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे व तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.यासंबंधीची माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.