हिंगोली: लिगो इंडियाच्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळेसाठी औंढा तालुक्यातील जागेची निवड जवळपास निश्चित झाली असून यासाठी १७0 हेक्टर जमिनीची गरज आहे. यासाठी ५ आॅगस्ट २0१६ ला औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.
भारतीय अणुऊर्जा आणि विज्ञान-तंत्रज्ञान विभागाकडून लिगो इंडियाची (लेसर इंटर पॅरामीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी) प्रयोगशाळेसाठी मागील एक ते दीड वर्षांपासून शास्त्रज्ञ औंढा तालुक्यातील दुधाळा, गांगलवाडी, काशीतांडा, अंजनवाडा आदी शिवारात अभ्यास करीत होते. या ठिकाणी गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास शक्य असल्याचे त्यांच्या पाहणीत आढळून आले होते. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार भारतात तीन ठिकाणी अशी पाहणी सुरू होती. त्यापैकी औंढ्याचे ठिकाणी अग्रस्थानी होते. अमेरिकेत ‘हान्सफोर्ड लिविंगस्टर’मध्ये असा अभ्यास करणाऱ्या दोन प्रयोगशाळा अगोदरच अस्तित्वात आहेत. भारतात ही तिसरी प्रयोगशाळा राहणार आहे. या प्रकल्पाची अजून निश्चितीच नसली तरीही अंदाजित तीनशे कोटींपर्यंतचा हा प्रकल्प असल्याचे सांगितले जाते.
आतापर्यंत आयुका केंद्राचे तरुण सौरदीप आणि शरद गावकर यांनी या भागात १४ ते १५ वेळा पाहणी केली आहे. तर गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करणारे फ्रेड बहेजाद अशिरी व फ्रेड्रिक रब हे विदेशी शास्त्रज्ञही येथे येवून गेले आहेत. परमाणु ऊर्जा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिलेल्या पत्रानुसार विभागीय आयुक्तांनी ५ आॅगस्ट रोजी बैठक आयोजित केली. या पत्रात १७0 हेक्टर जमिनीची आवश्यकता असल्याचे नमूद केलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने म्हटले आहे. तर जागा अंतिम झाल्यास ती उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
२ आॅगस्टला पथक येणार२ आॅगस्टला पुन्हा एकदा आयुकाचे पथक पाहणीस येणार आहे. भौतिक व निवास सुविधा आदी बाबींवर जिल्हा प्रशासनाशी चर्चा होणार आहे. अजूनही यात बऱ्याच बाबी स्पष्ट होणे बाकी असल्याचे शरद गावकर यांनी सांगितले.
औंढ्याचीच जागा का?भूगर्भातील हालचालींच्या नोंदी व ब्रह्मांडातील गुरत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त पठार, आवश्यक उंचीतील डोंगर व योग्य भूपृष्ठ असल्याचे निष्कर्ष आहेत. तर १६ किमी परिसरात रेल्वेपटरी नसावी, पुढील १५ वर्षांत तशी शक्यता नसावी, ४ ते ६ किमीपर्यंत वाहतुकीची वर्दळ असू नये, ६0 किमी परिसरात विमानतळ असू नये, किमान २0 किमी परिसर शांत असावा, २00 किमीपर्यंत समुद्रकिनारा नसावा, तर शास्त्रज्ञांना प्रवास सुकर व्हावा एवढ्या अंतरावर विमानतळ असावे आदी निकष आहेत. त्यातील बहुतांश पूर्ण करणारे हे ठिकाण आहे.