अंबरनाथ : राज्यातील सर्वात महत्वाच्या प्रकल्पापैकी एक प्रकल्प म्हणजे गांडूळ खत प्रकल्प हा सर्वप्रथम अंबरनाथ पालिकेने उभारला होता. मात्र हा प्रकल्प जास्त काळ चालविणे पालिकेला शक्य झाले नाही. त्यामुळे हा प्रकल्प बंद करण्याची वेळ पालिकेवर आली होती. अंबरनाथ पूर्व भागातील शिवालिक नगरमध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. सोसायटीच्या सदस्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेत सोसायटीच्या आवारातील जागेतच हा प्रकल्प लहानशा स्वरुपात सुरु केला. पालिकेचा आरोग्य विभाग त्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे. स्थानिक नगरसेविका रेश्मा काळे आणि अंबरनाथ पालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. सोसायटीमधील ओला कचरा या प्रकल्पात टाकून त्यापासून गांडूळ खत तयार करण्यात येणार आहे. शिवालिक नगर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, संजीव नायडू, सुभाष शिंदे, एल.बी.यादव, सी.व्ही.कापसे, सुबीर बॅनर्जी, सुभाष साबळे आणि भानुदास शिंदे यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प सुरु केला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर इतर सोसायटींना देखील असा प्रकल्प राबविण्याचा सल्ला दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)
सोसायटीत उभारला गांडूळ खत प्रकल्प
By admin | Published: October 08, 2016 3:20 AM