- नरेंद्र गुरवनंदुरबार - सर्वसामान्य माणसाला परदेशातील पर्यटनस्थळाचं मोठं आकर्षण असतं. त्याठिकाणी जाणं सर्वांनाच शक्य होत नाही. अशात तेथून नेणाऱ्या पर्यटकांना भेटून त्यांच्यासोबत बंध जोडला जावा असा प्रयत्न करणारेही कमी नाहीत, यातीलच एक व्यक्ती म्हणजे नंदुरबारचे रवींद्र पाटील. परदेशी पर्यटकांसोबत मैत्री ठेवत त्यांच्या स्मृती म्हणून परदेशी चलनी नोटांचा त्यांचा संग्रह ग्रामीण भागात आकर्षण आहे.प्रकाशा, ता़ शहादा येथे कृषी साहित्य विक्री करणारे रविंद्र पाटील हे नंदुरबार येथील रहिवासी आहेत़ बालपणापासून त्यांना विविध देशांची माहिती गोळा करण्याचा छंद होता़ आपणही कधीतरी या देशांना भेटी देणार म्हणून ते हा छंद जोपासत होते़ परंतू वाढत्या वयानुसार त्यांचा हा छंद मागे पडला़ परंतु कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना बºयाच वेळा ठिकठिकाणी फिरस्तीचा योग आला़ देशातील तीर्थ आणि पर्यटनस्थळांवर भेटी देत असताना त्यांच्या मनातील जुन्या छंदाने उचल खाल्ली, परंतु आता परदेशात जाण्यापेक्षा तेथील चलनी नोटा गोळा करुयात म्हणून त्यांनी परदेशी नागरिकांसोबत मैत्री करत भारतीय रुपयाच्या बदल्यात त्या देशातील चलनी नोटा मागितल्या. यात सुरुवातीला यश आले नाही, भाषा अडसर ठरली, यावर मात करत त्यांनी समजण्या-बोलण्यापुरते इंग्रजी शिकून संवाद साधण्यास सुरुवात केली यातून मग त्यांची चीन, जपान, रशिया, थायलंड, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, फिलिपिन्स, कॅनडा, सौदीअरेबिया, नायजेरिया, फ्रान्स आणि इंग्लंडमधील पर्यटकांसोबत संवाद साधला़ साहित्य खरेदी किंवा फिरस्तीला गेल्यास पर्यटकांचा शोध घेत त्यांच्या मैत्री करतात. यातून त्यांच्याकडून त्यांच्या देशातील चलनी नोटांची मागणी करतात. बदल्यात भारतीय नोटा देऊन टाकतात़ त्यांच्या मैत्रीपूर्ण संवादाने ब-याच जणांनी आठवण म्हणून नोटा भेट दिल्या आहेत.
एका ब्रिटीश पर्यटकाने तर त्यांना नेपाळ, श्रीलंका, भूतान या देशांच्याही नोटा भेट दिल्या होत्या़ या सर्व चलनी नोटा त्यांनी दुकानावरच काचेचा खाली या नोटा ठेवल्या आहेत. येणा-या प्रत्येक ग्राहकाला त्या दिसतात. ग्राहकदेखील त्यांच्या या छंदाचे कौतुक करतात. १४ वर्षापासून त्यांचा हा छंद सुरू असून आतापर्यंत त्यांच्याकडून ३० पेक्षा अधिक देशांच्या नोटांचे संकलन झाल्याची माहिती आहे़