सगळ्यात मोठा अपेक्षाभंग उद्धव ठाकरेंनी केला की अजित पवारांनी?; देवेंद्र म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 07:37 PM2019-12-13T19:37:42+5:302019-12-13T20:14:28+5:30
महिनाभर चाललेल्या सत्ता नाट्यावर देवेंद्र फडणवीसांचं भाष्य
मुंबई: राज्याच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिलेला असतानाही शिवसेना आणि भाजपाला सरकार स्थापन करता आलं नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेनं भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. तत्पूर्वी भाजपानं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मात्र भाजपाचा तो प्रयत्न फसला आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या ८० तासांमध्ये कोसळलं. यावर भाष्य करताना फडणवीसांनी या काळात झालेल्या सर्वात मोठा अपेक्षाभंग कोणी केला, याचं उत्तर दिलं.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास महिनाभर सत्तासंघर्ष चालला. त्यावेळी सर्वात मोठा अपेक्षाभंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यातल्या मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. मात्र उद्धव यांनी निकाल लागताच आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटलं. त्यानंतर शिवसेनेनं थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीशी बोलायला वेळ होता. मात्र माझे फोन घ्यायला वेळ नव्हता, असं फडणवीस म्हणाले.
शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी बोलणी सुरू केल्यानं आम्ही अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आम्ही अजित पवारांकडे गेलो नव्हतो. तेच आमच्याकडे आले होते. त्यांनी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिल्यानं आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करुन सकाळी शपथविधी घेतला, असं फडणवीस म्हणाले. या संपूर्ण घटनाक्रमाची शरद पवारांना कल्पना होती. मात्र त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या अर्धसत्य आहे. त्यांच्यात आणि मोदींमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे पुढे कळेलच, असं म्हणत फडणवीस यांनी सस्पेन्स कायम ठेवला.