प्रभू पुजारी, पंढरपूर‘चंद्रभागेत स्नान आणि दर्शन विठोबाचे’ हा एकच ध्यास मनी ठेवून आलेल्या साडेचार लाख भाविकांनी शुक्रवारी कार्तिकी एकादशीला कडाक्याच्या थंडीतही चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेत सहभागी होण्याचा मान दर्शनरांगेतील विलास शेलवले (५२) आणि त्यांच्या पत्नी वनिता (४६) या वारकरी दाम्पत्यास मिळाला. राज्यात सुख, शांती, समृद्धी नांदो, असे मागणे त्यांनी विठूरायाकडे केले. वारीत दर्शनरांगेतून हजारो भाविक पददर्शन घेत असतात़ मात्र शासकीय महापूजा सुरू होताच पददर्शन बंद करण्यात येते़ परिणामी, भाविकांना तिष्ठत थांबावे लागते़ यंदा प्रथमच कमी वेळेत शासकीय महापूजा करण्यात आली़ यासाठी जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी नियोजन केले. मध्यरात्री २़१५ ते ३़३० दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा झाली़ नंतर त्वरित पददर्शनास प्रारंभ झाला़