"अतिशय चुकीचे, पण...", पार्थ पवार व गुंड गजा मारणे भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 12:13 PM2024-01-26T12:13:54+5:302024-01-26T12:14:41+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह गुंड गजा मारणेच्या घरी भेट दिली. या भेटीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत.
पुणे : पुण्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत सातत्याने चर्चा होत असते. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह गुंड गजा मारणेच्या घरी भेट दिली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तसेच, या भेटीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. त्यावरून विरोधकांनी अजित पवार गटांवर निशाणा साधला आहे. या संदर्भात अखेर अजित पवारांनी भाष्य केले आहे.
पार्थ पवार आणि गुंड गजा मारणेची भेट अतिशय चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार म्हणाले, "पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची जी भेट घेतली आहे ते अतिशय चुकीचे झाले आहे. पण, पार्थ ज्या घरी गेला होता, त्याठिकाणी गजा मारणे आला होता. माझ्यासोबत देखील असाच प्रकार घडला होता, मात्र मी आता या संदर्भात काळजी घेतो आणि पोलीसांना आधीच सांगून ठेवतो."
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार, माजी नगरसेवक बंडू केमसे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी गजा मारणे आणि पत्नी जयश्री मारणे यांची पार्थ पवारांनी भेट घेतली, तेव्हा गजा मारणेकडून पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवारांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोण आहे गजा मारणे?
मुळशी तालुक्यातील गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा पुणे शहरातील कुख्यात गुंड आहे. गुन्हेगारी क्षेत्रात गजा मारणेवर खंडणी, हत्या, मारामारी यासारख्या असंख्य गुन्ह्यांची नोंद आहे. पुणे शहरात त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये एका हत्येप्रकरणी गजा मारणेवर कारवाई करण्यात आली होती. नवी मुंबईतील तळोजा जेलमधून सुटका झाल्यावर गजा मारणेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने चाहते जमले होते. मुंबई ते पुणे हजारो गाड्यांच्या ताफ्यात गजा मारणेची रॅली काढण्यात आली. त्यावेळी गजा मारणे प्रसिद्धीझोतात आला.